‘रामकृष्ण हरी’चा गजर, गावोगावी काकडारतीचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:48 AM2017-10-19T02:48:30+5:302017-10-19T02:48:42+5:30
कोजागरी पौर्णिमेपासून ग्रामीण भागात काकडारतीला सुरुवात झाली आहे. कामशेतसह, जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, खांडशी, नसावे, सांगिसे, वडिवळे, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांब्रे नामा, कोंडीवडे,नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत, पाथरगाव, चिखलसे, नायगाव, कान्हे आदी व मावळातील इतर अनेक प्रमुख गावांसह
कामशेत : कोजागरी पौर्णिमेपासून ग्रामीण भागात काकडारतीला सुरुवात झाली आहे. कामशेतसह, जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, खांडशी, नसावे, सांगिसे, वडिवळे, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांब्रे नामा, कोंडीवडे,नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत, पाथरगाव, चिखलसे, नायगाव, कान्हे आदी व मावळातील इतर अनेक प्रमुख गावांसह वाड्या-वस्त्यावर विठ्ठल मंदिरात काकडारती सुरू झाली. सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी गावातील लोक जमा होतात.
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरूडापारी दाटला! वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनि हात! असे अभंग, भूपाळ्या, भजन, वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळे, मुका बहिरा, गवळणी, रूपक, महाआरती, पसायदान गाऊन गावोगावी काकडा आरतीचा गजर सुरू झाला आहे. भल्या पहाटे गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठलनामाचा महिमा गाण्यासाठी गावातील आबालवृद्ध गर्दी करू लागले आहेत.
गावोगावची सार्वजनिक मंडळे, काकडा आरती सोहळा समिती, भजनी मंडळांसह गावांमधील ज्येष्ठ नागरिक आदींच्या पुढाकाराने गावागावांमध्ये आध्यात्मिक वातावरण तयार होत आहे. विठ्ठलनामाचा जप आणि संतांच्या अभंग ओव्या मावळवासीयांसाठी मोठा ठेवा असून, या ठेव्याचे जतन बाराही महिने वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमांतून जतन केले जात आहे. सध्या खेडोपाडी काकडारती सोहळ्यात गाव दुमदुमून निघाला आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटेपासून सुरुवात झालेल्या या सोहळ्याची त्रिपुरारी पौर्णिमेला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होते.
पहाटेच्या सुमारास मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून ‘जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी’ मंत्राचे स्वर बाहेर पडतात आणि गावातील आबालवृद्धांची पावले मंदिराकडे वळतात. राम कृष्ण हरी मंत्रापासून सुरू होणारे भजन, अभंग, भूपाळ्या, ओव्या गात पुढे जात
याच दरम्यान गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात भक्तिभावाने विठ्ठलाची पूजा करीत आहेत. प्रत्येकाला पूजेचा बहुमान मिळत असल्याने गावातील सर्वांचाच सहभाग वाढत आहे. कार्यक्रमानंतर होणाºया चहापानाच्या कार्यक्रमामुळे आध्यात्मिक विचारांची व वारकरी संस्कारांची देवाणघेवाण वाढू लागली आहे.
काकडा आरतीची पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी सातपर्यंत होते. विशेषत: महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गावातील तरुण मुले, वयस्कर व्यक्ती व लहान मुले पहाटेपासून आवर्जून उपस्थित राहतात. देवाला अभिषेक करून पूजा केली जाते. या पूजा करण्याचा मान दररोज गावातील वेगवेगळ्या लोकांना मिळतो. ज्यांचा पूजेचा मान असतो, त्या दिवशी त्यांच्या घरातील सर्व परिवार उपस्थित असतात. या वेळी संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई व इतर संत-महंतांचे अभंग गायले जातात.
परंपरा : अखंडित ठेवण्याचा प्रयत्न
कामशेतसह मावळातील सर्वच गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने काकडा आरती अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे. यामुळे गावागावांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण होते आहे. परंपरा मोडू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाणे मावळातील कांब्रे (नामा) येथील विठ्ठल-रखुमाई सेवा भजनी मंडळ हे आहे.
कांब्रे नामा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराचे काम सुरू असताना देखील विठ्ठलाची सेवा करण्यासाठी सेवेमध्ये खंड न पडावा या हेतूने गावाच्या पारावर विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये लाकडी स्टेज बांधून येथे काकडा आरती, भजन, सायंकाळी हरिपाठ आदी काकडा आरती कार्यक्रम सुरू आहेत.