पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयांची चिंताजनक परिस्थिती; एका बेडवर दोन मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:54 PM2022-08-14T13:54:52+5:302022-08-14T13:55:17+5:30

पावसाळ्यामुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, कावीळ, अतिसार, न्यूमोनिया, अस्थमा या आजारांचा त्रास

Alarming situation of Pimpri Municipal Hospitals two children in one bed | पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयांची चिंताजनक परिस्थिती; एका बेडवर दोन मुलं

पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयांची चिंताजनक परिस्थिती; एका बेडवर दोन मुलं

Next

पिंपरी : पावसाळ्यामुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, कावीळ, अतिसार, न्यूमोनिया, अस्थमा या आजारांचा त्रास होत आहे. यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागात दिवसाला सरासरी १०० रुग्णांची ओपीडी होत आहे, तर दिवसाला १४ ते १६ रुग्ण दाखल होत आहेत. परिणामी बालरोग विभागात जागा कमी पडत आहे. एका बेडवर दोन मुलांना दाखल करावे लागते.
वायसीएम रुग्णालयात सद्य:स्थितीत नवजात मुलांसाठी एक आयसीयू वॉर्ड आहे. त्यामध्ये २५ बेडची व्यवस्था आहे, तर लहान मुलांसाठी एक वॉर्ड आहे, त्यामध्ये ३० बेडची व्यवस्था आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता अजून एक वॉर्ड असणे आवश्यक आहे.

महापालिकेने नव्याने बांधलेल्या नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, आकुर्डी, येथे बालरोग विभाग सुरू केला आहे. या तिन्ही रुग्णालयांत प्रसूती विभाग असल्याने येथे नवजात मुलांसाठी आयसीयूदेखील सुरू केला आहे. या तिन्ही रुग्णालयांत बालरोग विभाग सुरू झाल्याने काही प्रमाणात का होईना वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाचा ताण कमी झाला आहे. परंतु, येथे १ महिना ते १२ वर्षांच्या मुलांना दाखल करण्यासाठी बेड मर्यादित असल्याची स्थिती आहे. नवीन भोसरी रुग्णालयातदेखील बालरोग विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. वायसीएम रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शहराबरोबर जिल्ह्यातून रुग्ण येतात. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची आणि दाखल होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

३० बेडचा अजून एक वॉर्ड हवा

वायसीएम रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या मुलांना दाखल करण्यासाठी ३० बेडचा एक वॉर्ड आहे. दिवसाला दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता अजून ३० बेडचा एका वाॅर्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या इतर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील बेडची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

''नवीन थेरगाव, आकुर्डी, जिजामाता रुग्णालयात बालरोग विभाग आहे. भोसरी रुग्णालयात देखील सुरू करण्यात येणार आहे. सध्याच्या वातावरणामुळे महापालिकेच्या सर्वच रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे. पूर्वी २०० ते २५० रुग्णांची ओपीडी होत होती, तिथे आता सरासरी ५०० रुग्णांची ओपीडी होत आहे. सर्वच रुग्णालयांतील बालरोग विभागाची ओपीडी वाढली आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी'' 

Web Title: Alarming situation of Pimpri Municipal Hospitals two children in one bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.