सर्व राजकीय पक्षांनी दिली तरुणांना संधी
By admin | Published: February 13, 2017 01:59 AM2017-02-13T01:59:44+5:302017-02-13T01:59:44+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी लढत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम अशा सर्वच राजकीय
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी लढत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम अशा सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी तरुणांना पसंती दिली आहे. सहाही पक्षांच्या उमेदवारांचे सरासरी वय पस्तीस ते चाळीस वर्षे आहे.
कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या उमेदवारांचे सरासरी वय तीस ते चाळीस वर्ष आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपाने काही ज्येष्ठांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या उमेदवारांचे सरासरी वय हे ४२ पेक्षा थोडे अधिक आहे. यंदाच्या वेळी प्रथमच स्वबळावर लढत असलेल्या शिवसेनेचे उमेदवार सरासरी पस्तीस ते चाळीस वर्षांचे आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी मनसे आणि शिवसेनेने तुलनेने तरुणांना उमेदवारी दिली आहे. मनसेचे उमेदवार सरासरी चाळीस वर्षांचे आहेत. गेल्या १० वर्षांत पिंपरी-चिंचवड मधील राजकारण आणि अर्थकारणही बदलले. त्याचबरोबर अनेक भागांचा नव्याने विकास झाला. त्यामुळे या भागातील राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब पालिकेच्या उमेदवारीमध्ये उमटले आहे.
सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांकडे पाहिल्यास शहराच्या गावठाण आणि ग्रामीण भागातही प्रौढ उमेदवार अधिक असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून नगरसेवकपदी असलेल्यांना राष्ट्रवादीने २२ विद्यमान नगरसेवकांना संधी नाकारली आहे. तर भाजपाने पंचवीस दुसऱ्या पक्षांतील उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र, शहराच्या भोवतालच्या उपनगरांच्या भागात मात्र तरुण आणि पन्नाशीच्या आतील उमेदवारांना संधी मिळाली आहे. गावठाणाच्या परिसरात गावकी आणि भावकीचे चित्र दिसून येते आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, थेरगाव, वाकड, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख, मोशी, चऱ्होली, दापोडी, तळवडे, दिघी या परिसरात स्थानिकांनी आपला दबदबा टिकवून ठेवला होता. गेल्या काही वर्षांत या घराण्यांचा शब्द मानला जात होता. सगळ्याच पक्षांनी या घराण्यांची पुण्याई कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागात साधारणत: चुलत घराण्यांमध्येच लढत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रस्थापितांना तरुणांनी आव्हान दिल्याचे दिसून येते. त्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्याकडे प्रस्थापित नेतृत्व असल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या तरुणांनी शिवसेना किंवा मनसेची सहभाग घेतल्याचे दिसून येते.
भाजपा आणि शिवसेनेने ३० वर्षांपर्यंतच्या तरुणांना सर्वाधिक उमेदवारी दिली आहे. मनसेचे २० उमेदवार हे ३० वर्षांपेक्षा कमी
वयाचे आहेत. ३० ते ४० वयोगटातही मनसेचे सर्वांत पुढे आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची एकट्याची उमेदवारसंख्या इतर पक्षांपेक्षा
कमी आहे. काँग्रेसने २४ ठिकाणी, तर राष्ट्रवादीने २७ ठिकाणी ३० पेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना संधी दिली आहे. मनसे वगळता सगळ्याच पक्षांत सर्वाधिक उमेदवार हे ४० ते ५० वयाचे आहेत. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक ३०, शिवसेनेचे २१, राष्ट्रवादीचे २० व काँग्रेसचे ५ उमेदवार आहेत.(प्रतिनिधी)