सर्वच रेल्वे स्थानकांवर गर्दुले, पाकीटमार, चोर
By admin | Published: August 8, 2015 12:29 AM2015-08-08T00:29:53+5:302015-08-08T00:29:53+5:30
सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेला प्रवाशांची पसंती असते. वाहतूककोंडीत अडकण्याची भीती नाही, की मिनिटाचाही उशीर होत नाही. लांब जायचे असेल,
सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेला प्रवाशांची पसंती असते. वाहतूककोंडीत अडकण्याची भीती नाही, की मिनिटाचाही उशीर होत नाही. लांब जायचे असेल, तर अगदी घरातल्यासारखे झोपूनही जाता येते...अशा विविध कारणांमुळे दररोज हजारो प्रवासी रेल्वेचा आधार घेतात. मात्र, या प्रवाशांना स्थानकावर किमान काही चांगल्या सुविधा मिळाव्यात, असे प्रशासनाला वाटत नाही. याचमुळे शहरातील एकही स्थानक चकाचक नाही. भिकारी, पाकीटमार, चोर, गर्दुले, टवाळखोर अशा ओंगळ वातावरणात कमालीच्या अस्वच्छतेची भर पडली आहे. स्वच्छतागृह कोठे आहे, याची पाटीसुद्धा लावण्याची गरज नाही. असा उग्र दर्प कित्येक मीटरवरून नाकात शिरतो. जागोेजागी फेरीवाले, एजंटांकडून लुटालूट...‘लोकमत टीम’च्या पाहणीतील ही निरीक्षणे...
स्थानक परिसरात असलेला रोडरोमिओ, गर्दुले, मद्यपी, जुगारी यांना पार करूनच खडकी रेल्वे स्थानकावर प्रवाशाला जावे लागते. यात भर घालतात, ती चावणारी भटकी कुत्री व तृतीयपंथी. स्थानक परिसरात एकही सीसीटीव्ही नाही. त्यामुळे अशा लोकांचे व पाकीटमारांचे फावते. सगळीकडे अस्वच्छता व दुर्गंधी असून, वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्षच झालेले दिसते. यावर एक किंवा दोन पोलीस मूडप्रमाणे कामासाठी दिसतात. तर, बहुतांश पोलीस या परिसरात खुलेआम चालणाऱ्या जुगार, मटका या अवैध धंद्यांना संरक्षण देताना दिसतात. छापा पडणार असल्याची टीप अवैध धंदेचालकांना अगोदरच दिली जाते. त्यामुळे त्या दिवशी धंद्याची ठिकाणे बदलली जातात.
स्थानकात प्रवेश केल्यावर जागोजागी पडलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, तंबाखू, गुटखा खाऊन रंगविलेल्या भिंती, तुंबलेले सांडपाणी, आसनांची दुरवस्था, स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी, बंद पंख्यांमुळे हैराण झालेले प्रवासी असे चित्र दिसत असते. महिला स्वच्छतागृहात दुर्गंधी आहे, तरी तशाच अवस्थेत त्याचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याचेही स्पष्ट होते. तुटलेली भिंत, बंद कॅन्टीन, बंद वेटिंग रूम अशी दयनीय अवस्था यात आहे
शहर व परिसरात लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलच्या प्रवाशांचीही संख्या दिवसेंदिवस वाढणे अपेक्षित आहे. या मार्गावर ‘मेगा ब्लॉक’चे प्रमाण गेल्या वर्षात वाढले आहे. त्यामुळे लोकलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे. तुलनेत पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे स्थानकावरून पीएमपीएल बससेवाही विस्तारली आहे. नोकरीनिमित्त खडकीहून लोणावळा, कामशेत, तळेगाव, देहूरोड, निगडी, चिंचवड दरम्यान रोज शेकडो प्रवाशांची वर्दळ खडकी स्थानकावरून असते. औद्योगिकीकरण वाढल्याने दहा वर्षांत प्रवाशांची संख्या तिप्पट झाली आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलची संख्या वाढलेली नाही आणि सेवासुद्धा सुधारलेली नाही. लोकल वेळेत आली नाही, तर आॅफिसला उशीर होतोच. तसेच, गर्दी वाढून समस्या अधिकच बिकट होते.
आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोकांच्या त्रासामुळे प्रवासी वैतागले आहेत. आरसीएफ आणि महाराष्ट्र रेल्वे पोलीस दलाचे कॉन्स्टेबल नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. मारहाण, लूटमार, चोरीचे प्रकार सर्रास घडतात. गर्दुले, मद्यपी स्थानकावर बिनदिक्कतपणे वावरत असतात, अशी व्यथा प्रवाशांनी व्यक्त केली. शहरातील हद्दीवरील दापोडी हे पहिले स्थानक आहे. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. येथील नागरिक दापोडी स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकावर प्रवासी संख्या मोठी आहे. स्थानकाशेजारी झोपडपट्टी आहे. रहिवाशांनी स्थानकाची भिंत तोडून स्थानकाचा वापर नियमित ये- जा करण्यासाठी सुरू केला आहे.
स्थानकावरील स्वच्छतागृहाचा वापर ही मंडळी करीत असल्याने त्याला टाळे ठोकले आहे. स्वच्छतागृहास टाळे दिसल्याने प्रवासी त्याचा वापर करण्यास धजावत नाहीत. यामुळे त्यांची गैरसोय होते. परिसरात दारूचे धंदे, तसेच अवैध धंदे चालत असल्याने स्थानकावर मद्यपी, गर्दुल्यांचा वावर कायम असतो. नाइलाजास्तव त्यांचा त्रास सहन करीत लोकलची वाट पाहत थांबावे लागते. प्रवाशांना मारहाण, लूटमारीच्या घटना येथे नेहमीच घडतात. स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत येत असल्याने येथे आरसीएफ आणि महाराष्ट्र पोलीस दुर्लक्ष करतात. ते नियमितपणे स्थानकावर येत नाहीत. तक्रार केल्यानंतर ते येतात. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, असे नियमितपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
मुळा नदीवरील हॅरिस पुलावरील खांबांना धडकून अनेक प्रवासी ठार झाले आहेत. लोकलच्या दरवाजामध्ये थांबलेले प्रवासी खांबाला धडकतात. त्यात जखमी होऊन ते मुळा नदीपात्रात पडतात. जखमी आणि बुडून त्यांचा मृत्यू होतो. अशा प्रकारे महिन्यातून एकदी तरी घटना येथे घडते. खडकी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना खबर दिली जाते. अग्निशामक दल आणि शहर पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोधून काढला जातो. प्रवाशांनी दरवाजात न थांबल्यास असे प्रकार होणार नाहीत, असे व्यवस्थापक विश्वजित कीर्तिकर यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण व पिंपरी बाजारपेठ असल्यामुळे या स्थानकावर दिवस-रात्र प्रवाशांची गर्दी असते. या स्थानकावरून दररोज ४ हजार प्रवासी विविध ठिकाणी जातात. येथून पुणे-लोणावळा १८ लोकल, लोणावळा-पुणे १८ लोकल, तर पुणे-तळेगाव ४, तळेगाव-पुणे ४ अशा एकूण ४४ लोकल फेऱ्या या स्थानकावरून होतात. तर, पुणे-मुंबई व कोल्हापूर-मुंबई या एक्सप्रेस रेल्वे, याचबरोबर बारामती-कर्जत शटल, पंढरपूर-मुंबई पॅसेंजर या स्थानकावर येता-जाता थांबतात. येथील फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या तिकीटधारकांची संख्या २० आहे, तर महिना पासधारकांची संख्या २४० इतकी आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असतानाही या ठिकाणी आगाऊ बुकिंगची व्यवस्था नाही. त्यासाठी चिंचवड अथवा खडकीला जावे लागते. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. स्थानकामध्ये कँटिनची सुविधा नाही. यामुळे प्रवाशांना जेवण, चहा, नाष्टा स्थानकाबाहेर जावे लागते. यामुळे अनेक वेळा रेल्वे सुटतात. अनेक प्रवाशांना स्थानकावरच बसून राहावे लागते.
प्रवाशांसाठीच्या बाकावर गर्दुले बिनधास्त झोपलेले असतात. भिकारीही गलिच्छपणे जागोजागी भीक मागत असतात. अनेक जण कानाकोपऱ्यांत जुगार, पत्ते खेळत असतात. तसेच, पाकीटमार गर्दीत घुसून पाकीट चोरून पसार होतात. यामुळे प्रवाशांना प्रवास करीत विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. एवढे मोठे स्थानक असतानाही एकही सीसीटीव्ही बसवलेला नाही.
अनेक प्रवासी या ठिकाणी दोन उड्डाणपूल असतानादेखील आपला जीव धोक्यात
घालून रुळावरून ये-जा करीत असतात.
यामुळे या ठिकाणी अनेक जणांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. स्थानकाच्या परिसरात दर महिन्यात दोन-तीन जणांचा मृत्यू होतो. या ठिकाणी रेल्वे पोलीस चौकी असून यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक, १ पोलीस हवालदार, २ पोलीस शिपाई सुरक्षेसाठी असतात. तर, रात्रीच्या वेळीदेखील ३ पोलीस कर्मचारी या चौकीत असतात.