मोडीत निघालेल्या पारंपरिक मूर्तिकलेत रंगले अख्खे कुटुंब
By admin | Published: August 31, 2015 03:49 AM2015-08-31T03:49:43+5:302015-08-31T03:49:43+5:30
जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक पारंपरिक व्यवसाय मोडीत निघाले. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी अशा कुटुंबीयांनी अन्य पर्यायी व्यवसाय निवडले. अशाच
नारायणपूर : जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक पारंपरिक व्यवसाय मोडीत निघाले. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी अशा कुटुंबीयांनी अन्य पर्यायी व्यवसाय निवडले. अशाच पारंपरिक व्यवसायात जम बसवून चांबळीमधील राजेंद्र कुंभार आणि कुटुंबीयांनी देखण्या गणेशमूर्ती तयार करण्यात तालुकाभरात लौकिक मिळविला आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. या आनंददायी सोहळ्याची चाहूल लागताच गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी सर्वत्र तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात व्यग्र आहेत. चांबळीमधील राजेंद्र कुंभार यांचे संपूर्ण कुटुंबीयही मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहे.
या कुटुंबीयांचा मूर्ती तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मूर्ती बनविण्याचे काम घरच्या घरीच करतात. त्यांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी आहे.
यंदा त्यांनी गणेशाच्या एक हजार मूर्ती बनविण्याचे नियोजन केले आहे. सध्या सहाशे मूर्तींचे काम पूर्ण झाले असून चारशे मूर्तींचे काम बाकी आहे. त्यांच्याकडे अगदी पन्नास रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. (वार्ताहर)