अवैध धंद्यांचा परिणाम होतोय तरुणाईवर, छावा संघटनेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:20 AM2019-02-19T01:20:24+5:302019-02-19T01:20:43+5:30
छावा संघटनेचा आरोप : पोलीस आयुक्तालयावर आंदोलन करण्याचा दिला इशारा
पिंपळे गुरव : पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे. गेल्या आठवड्यात मटका अड्ड्यावर एकाचा खून होऊनही पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोहीम थंडच आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई कडक होणे आवश्यक आहे अन्यथा छावा मराठा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी दिला आहे.
संघटनेतर्फे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पुनर्निवेदनात म्हटले आहे, की शहर व उपनगरांतील अवैध धंदे रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात २० जानेवारी रोजी निवेदन दिले होते. मात्र, प्रजासत्ताक दिनानंतरही अवैध धंदे जोमात सुरूच आहेत. हे असेच सुरू राहिले, तर शहर व उपनगरांमध्ये गुन्हेगारी फोफावल्याशिवाय राहणार नाही. पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची वेळ आली आहे. नव्याने पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊनही गुन्हेगारी अवैध धंदे तसेच गुन्हेगारी रोखण्यात पोलीस आयुक्तांना अपयश आले आहे. आयुक्तांनी सुरुवातीला अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे नागरिकांमधून आनंदाचे वातावरण होते. शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
गेल्याच आठवड्यात दापोडी येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून झाला. हा खून पूर्ववैमनस्यातून झालेला असला, तरी तो मटका अड्ड्यावर झालेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अवैध धंद्यांची ठिकाणेच गुन्हेगारीचे अड्डे बनलेले आहेत, हे सर्वांना माहीत आहेच. परिसरात महिलांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.
४गुन्हेगारी आटोक्यात राहावी, अवैध धंद्यांवर नियंत्रण हवे. हा स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीमागील उद्देश होता. हा उद्देश सफल व्हावा, ही अपेक्षाही राम जाधव यांनी व्यक्त केली.
४प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. किराणा मालाची दुकाने थाटल्याप्रमाणे जुगाराचे आणि मटक्याचे अड्डे सुरू झाले आहेत. वसूलदार म्हणून नेमलेले पोलीस या अवैध धंद्यांना परवानगी देत सुटले आहेत. लाखोंची वसुली चालू आहे, असा आरोपही रामभाऊ जाधव यांनी निवेदनात केला आहे.