मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युतीबाबत आग्रही: रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 05:06 PM2018-10-26T17:06:13+5:302018-10-26T17:10:34+5:30
युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे.
पिंपरी : आगामी निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युतीबाबत अजून चर्चा आणि बैठकाही सुरू झालेल्या नाहीत. मात्र, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करण्यास आग्रही असू, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. जागाबाबत आणि युतीबाबत थेटपणे बोलणे त्यांनी टाळले.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत माध्यमांनी संवाद साधला. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघ हे शिवसेनेचा आहे, भाजपाचा दावा या मतदार संघांवर असणार आहे का? या प्रश्नावर दानवे म्हणाले, पक्षसंघटना वाढीसाठी बैठका आणि महासंमेलन होणार आहे. कार्यकर्ता संवाद आणि मेळावे राज्यभर होत आहेत. ज्या मतदार संघात ताकद कमी आहे. तेथे संघटनात्त्मक बांधणी करणे, ताकद वाढविण्याचा प्रयत्त्न आहे. मतदार संघांवर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. जागा वाटपाचे काय होणार हे युतीबाबतच्या पक्षाच्या बैठकीत ठरणार आहे.
शिवसेनेशी युतीबाबत दानवे म्हणाले, युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे.लोकसभा विधानसभा एकत्र होणार की वेगवेगळ्या या प्रश्नावर त्यांनी सांगितले,दोन्ही निवडणूका वेगवेगळ्याच होणार आहेत. एकत्रिपणे करण्याचे नियोजन नाही. तसेच शिवस्मारकाचे काम लवकर व्हावे याबाबत आग्रही आहोत. काल घडलेली घटना दुर्देवी आहे. यापुढे काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि डॉ. बाबासाहेब आबेडकरांचेही स्मारक व्हावे यासाठी काम सुरू आहे.