प्रचारफेरीतच वस्तू, नाण्याचे वाटप
By admin | Published: February 16, 2017 03:14 AM2017-02-16T03:14:26+5:302017-02-16T03:14:26+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकीच्या प्रचारफेरीमध्ये उमेदवारांकडून शहरातील काही ठिकाणी मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकीच्या प्रचारफेरीमध्ये उमेदवारांकडून शहरातील काही ठिकाणी मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू व चांदीच्या नाण्यांचे वाटप केले जात असल्याची चर्चा आहे. निवडणूक काळात मतदारांना आमिष दाखविणे गुन्हा असताना राजरोसपणे नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
पिंपरी कॅम्प परिसरात एका पक्षाच्या पॅनलच्या उमेदवारांकडून प्रचारफेरीवेळी चांदीचे नाणे वाटप केल्याची मार्केटमध्ये चर्चा आहे. परिसरात प्रचारपत्रके व नाणे पोहोच केली आहेत. एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणलेली नाणी व प्रचारपत्रके उमेदवारांच्या समर्थकांकडून घरपोच केली जात होती. हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिक सांगतात. मोरवाडी परिसरात एका उमेदवाराने मिक्सर वाटप केल्याची चर्चा होती. ताथवडे परिसरात मंगळवारी एका गोदामात बसून एका पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती समोर आली होती. पोलीस येताच पैसे वाटप करणारे पसार झाले. संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.(प्रतिनिधी)