पिंपरीतील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध ; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:16 PM2020-10-15T21:16:18+5:302020-10-15T21:17:06+5:30
पिंपरीत सुराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र अतोनात प्रयत्न करणार
पिंपरी : महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे असे सुराज्य निर्माण करण्यासाठी आपण अतोनात अहोरात्र प्रयत्न करण्यास कटिबध्द असून पोलिसांच्या अवतीभोवती असणाऱ्या दलाल आणि तडजोड करणाऱ्यांना दूर ठेवणार आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील महिला सुरक्षा बाबींविषयी चर्चा करण्यासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या समवेत आज महिला नगरसदस्यांची बैठक झाली.
या बैठकीस पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, नगरसदस्या सिमा सावळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे मंचावर उपस्थित होते.
.......
सदस्यांनी केल्या मागण्या
शहरातील अवैध धंदे, दारु, मटका, जुगार अड्डे गुन्हेगारीचे केंद्र असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील उद्भवत असल्याने अशा अवैध बाबींवर कारवाई करावी, शहरातील काही उद्यानात होणाऱ्या अश्लील प्रकारास आळा घालण्यात यावा, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण विचारात घेता त्याठिकाणी पोलिसांचे भरारी पथक नियुक्त करावे, रात्रीची गस्त वाढवावी. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची पोलीस दप्तरी नोंद असावी आदी सूचना नगर सदस्यांनी केल्या.
............
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, बैठकीतील सुचना तथा तक्रारींचे स्वरुप पाहता या समस्या केवळ गुन्हेगारीशी संबधित नसून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा बाबींशी निगडीत आहे. तसेच पोलीस आणि जनतेच्या मानसिकतेशीही याचा संबंध येतो.
पोलीस दलातील ९० टक्के लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात. मात्र उर्वरीत १० टक्के लोकांमुळे पोलीस दलाची प्रतिम मलिन होते. म्हणून नियमबाहय काम करणा-या पोलीसांवर नियमाधिन कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीसांच्या अवतीभोवती असणाऱ्या दलाल आणि तडजोड करणाऱ्यांना दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असून नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यास पुढे आले पाहिजे.
शाळा, कॉलेज परिसरात पोलीसांचे पथक नेमले जाईल. सराईत गुन्हेगारांवर तडीपारी सारखी कारवाईदेखील केली जाईल. गैरकायदेशीर कृत्याला आळा घातल्यास आपण सभ्य समाज निर्माण करु शकू. मात्र कोणीही कायदा हातात घेवू नये. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत समजून पोलिसांनी आपले कर्तव्य बजवावे.
नियमांची अंमलबजावणी करताना पोलीसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करु नये. पोलीसांची संख्या कमी असली तरी नागरिकांच्या सहकार्य आणि सहभागातून ही उणीव भरुन निघेल.'
.