हौशी इच्छुक नोटाबंदीने हैराण
By admin | Published: January 12, 2017 02:53 AM2017-01-12T02:53:44+5:302017-01-12T02:53:44+5:30
कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कोणाचेही मत मिळविण्याची पात्रता नसलेलेही गल्लीबोळातील कोणातरी पक्षाची
पिंपरी : कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कोणाचेही मत मिळविण्याची पात्रता नसलेलेही गल्लीबोळातील कोणातरी पक्षाची उमेदवारी घेऊन हौसेखातर निवडणूक रिंगणात उतरणारे शहरात अनेकजण आहेत. निवडणुकीचे वातावरण तापताच कोणता तरी झेंडा घेऊन उमेदवार म्हणून आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे या निवडणुकीत नोटाबंदीमुळे थंडावले आहेत. बँकेतून मर्यादित रक्कम मिळते. त्या तुटपुंज्या रकमेवर शक्तिप्रदर्शनाकरिता चार कार्यकर्तेही जमा करता येत नाहीत. अन्य कोणाकडून पैसे मिळविण्याचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात केवळ मोठ्या पक्षांच्या इच्छुकांचीच फ्लेक्सबाजी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ५०, १०० मते मिळविणारे कार्यकर्ते अनेक आहेत. निवडणूक हा काळ बहुतेकांच्यासाठी सुगीचा मानला जातो. हौसेखातर निवडणूक लढणाऱ्यांनाही निवडणूक काळात पैसे कमावण्याची संधी मिळते. कोणत्याच पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तरी ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेऊन अपक्ष लढण्याची हिंमतही अनेकांनी या अगोदरच्या निवडणुकीत दाखवलेली आहे. पराभव झाला, तरी एकदा नव्हे सलग दोन ते तीन वेळा अर्ज भरणारे, बोटावर मोजण्याइतपत मते मिळाली, तरी वारंवार निवडणूक रिंगणात उतरणारे शांत आहेत. पूर्वीसारखी त्यांची चुळबूळ दिसून येत नाही. त्याचे प्रमुख कारण आर्थिक चणचण आणि १० ते १५ हजार मतदारांऐवजी सुमारे ५० हजार मतदारांचा झालेला प्रभाग यामुळे अशांच्या हालचाली थंडावल्या आहेत.
आपली डाळ शिजणार नाही, पैसे मिळणे तर दूरची बाब, खिशातील पैसे घालविण्याची वेळ येईल, हे लक्षात घेऊन अनेकांनी सावध पवित्रा घेतला आहे. स्वत: रिंगणात उतरण्यापेक्षा कोणाला तरी मदत करायची, त्यातूनच काही तरी हाती लागेल, अशी मानसिकता करून हौसेखातर निवडणूक लढणारे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या ताफ्यात सामील झाले आहेत. (प्रतिनिधी)
अपक्षांचा पॅनल दिसणार अपवादाने
अपक्ष उमेदवारांचा चार जणांचा पॅनल तयार करून ही निवडणूक लढणे अत्यंत जिकिरीचे आहे. प्रमुख राजकीय पक्षांना प्रभागात चार उमेदवारांचा शोध घेणे कठीण झाले असताना अपक्षांचा पॅनल तयार करण्याचे धाडस दाखविणारे अपवादानेच दिसून येणार आहेत. ही निवडणूक सर्वच दृष्टीने कठीण ठरणारी आहे, अशा प्रतिक्रिया इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.