पिंपरीत जास्तीचे पैसे घेणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 03:51 PM2021-04-28T15:51:56+5:302021-04-28T15:58:21+5:30
कोरोनाच्या काळात रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची लूट सुरूच
पिंपरी: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्णालय, बेड मिळवण्यासाठी रुग्णांना प्रयत्न करावे लागत आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत त्यांना रुग्णवाहिकेसाठी धावपळ करावी लागत आहे. रुग्णवाहिका प्रादेशिक परिवहन विभागाकडून रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यात आले असले तरी, काही जणांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूट सुरूच आहे. त्यामुळे निश्चित दरापेक्षा जास्तीचे पैसे घेणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. याचा गैरफायदा घेऊन काही जणांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूट सुरू आहे. काही रुग्णवाहिकावाल्यांकडून जास्तीच्या पैशांची मागणी होत आहे. यातून अडवणूकही केली जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल होत आहेत.
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात घरातील कोणाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या खचत असते. काहीही करून आपल्या नातेवाईक रुग्णाला योग्य उपचार मिळून कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांच्याकडून पराकाष्टा केली जाते. याचाच गैरफायदा घेत काही जणांकडून त्यांची लूट केली जात आहे.याबाबत कृष्ण प्रकाश म्हणाले, काही मोजक्या रुग्णावाहिका चालकांमुळे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या इतरांचीही बदनामी होत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. कोणाची लूट होत असल्यास त्यांनी संबधित पोलीस ठाणे किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकरणात संबंधितांवर फसवणुकीचे तसेच खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच काही शववाहिका चालक देखील मृतांच्या नातेवाईकांकडे अशाच पद्धतीने पैसे मागून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. अशा शववाहिका व संबंधितांवरही कारवाई करण्यात येईल.
अंत्यसंस्कारांसाठी पैसे मागणारेही रडारवर
कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने खर्च करण्यात येत आहे. त्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले जात नाहीत. असे असतानाही अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडून पैशांची मागणी होत असल्यास संबंधितांवर देखील गुन्हे दाखल केले जातील. याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.