महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकीय उपचार रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:19 PM2018-06-25T15:19:07+5:302018-06-25T15:24:36+5:30
अगदी किरकोळ कारणासाठीदेखील हे कर्मचारी शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत असत. या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठराविक रुग्णालयांची यादी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केली.
पिंपरी : महापालिका अधिकारी व कर्मचा-यांना धन्वंतरी योजनेअंतर्गत पॅनेलवरील रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची सुविधा आहे. तातडीच्या उपचारांकरिता पॅनेलबाहेरील रुग्णालयातील उपचारांची माहिती काही तासांत महापालिका प्रशासनाला कळविली नाही. तरीही कर्मचाऱ्यांना मूळ बिलाच्या ७५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी वर्ग एक व चारच्या विविध पदावर काम करतात. सर्वांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना धन्वंतरी योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार केले जातात. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचादेखील समावेश केला आहे. याकरिता कार्यरत व सेवानिवृत्तांच्या निवृत्ती वेतनातून ठराविक रक्कम कपात केली जाते. यापूर्वी महापालिका कर्मचारी कोणत्याही रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत असत. मात्र, अगदी किरकोळ कारणासाठीदेखील हे कर्मचारी शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत असत. या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरसकट रुग्णालयांऐवजी धन्वंतरी योजनेअंतर्गत शहर व हद्दीबाहेरील ठराविक रुग्णालयांची यादी वैद्यकीय विभागाने जाहीर केली. त्यामुळे हा खर्च काही प्रमाणात आटोक्यात आला. यात आणखी एक बदल केला आहे. पॅनेलवरील कोणत्याही रग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्यापूर्वी वैद्यकीय विभागाची चिठ्ठी बंधनकारक केली आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी हद्दीबाहेर राहत असल्याने, पॅनेलवरील रुग्णालये त्यांच्या निवासस्थानापासून दूर अंतरावर आहेत. हे कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारांकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांना धन्वंतरी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असायचे. याबाबत वैद्यकीय विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्याला तातडीने गंभीर स्वरुपाच्या आजारासाठी पॅनेल बाहेरील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असेल, अशा कर्मचाऱ्याने वैद्यकीय विभागाला अपवादात्मक परिस्थितीत ११६ तासांच्या आत कळविले नसले, तरीदेखील या बिलाची ७५ टक्के रक्कम किंवा धन्वंतरीच्या दराप्रमाणे बिलाची रक्कम देण्यात येणार आहे.