Cyber Fraud: मित्राने लिंक पाठवल्याचे भासवून इंजिनियला लाखाचा गंडा
By नारायण बडगुजर | Published: June 17, 2023 06:24 PM2023-06-17T18:24:43+5:302023-06-17T18:25:01+5:30
हिंजवडी येथे ३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला...
पिंपरी : सायबर चोरट्यांनी आयटी इंजिनियरच्या मित्राचे इंस्टाग्राम व फेसबुक खाते हॅक केले. त्यानंतर इंजिनियरला त्यावरून वेबसाईटची लिंक पाठवून गुंतवणूक करण्यास सांगितले. मित्रानेच ही लिंक पाठविले असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी इंजिनियरची एक लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी येथे ३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
रजत महेंद्रकुमार शर्मा (वय ३२, रा. हिंजवडी, मूळ रा. तलवंडी कोटा, राजस्थान) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १५) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सोशल मीडियाच्या विविध अकाउंटच्या वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र अनुप जाॅन अलोशिस यांचा इन्स्टाग्राम आयडी आणि फेसबुक खाते हॅक करून आरोपींनी फिर्यादीला वेबसाईटची लिंक पाठवली. ही लिंक फिर्यादीचे मित्र अनुप अलोशिस यांनी पाठविली असल्याचे आरोपींनी भासविले. त्यानंतर त्या वेबसाइटवरून गुंतवणू करण्यास सांगितले. त्यानंतर विविध अकाउंटवर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने पैसे पाठवले. असे एकूण एक लाखांची फसवणूक आरोपींनी केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.