कंपनीतील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
By नारायण बडगुजर | Published: January 16, 2024 05:25 PM2024-01-16T17:25:38+5:302024-01-16T17:26:44+5:30
पोलिसांनी तपास केला असता, कर्मचाऱ्याचा छळ करण्यात आल्याचे समोर आले
पिंपरी : कंपनीतील वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रहाटणीतील नखातेनगर येथे ११ मार्च २०२३ रोजी ही घटना घडली.
प्रदीप अशोक देवताळे (३८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्लुरी, अमन, किरण कापुरे, अनिकेत देशमुख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप देवताळे हे फ्रेश टू होम या कंपनीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून नोकरी करत होते. कंपनीतील वरिष्ठ असलेल्या अल्लुरी, अमन, किरण कापुरे अनिकेत देशमुख यांनी प्रदीप देवताळे याला टार्गेट करून त्यांचा मानसिक छळ केला. तसेच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून प्रदीप यांनी ११ मार्च २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता, प्रदीप यांचा छळ करण्यात आल्याचे समोर आले. या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे निष्प्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे तपास करीत आहेत.