Anant Chaturdashi 2022| 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर...' पिंपरी- चिंचवडमध्ये घरगुती गणरायाचे विसर्जन
By विश्वास मोरे | Published: September 9, 2022 02:20 PM2022-09-09T14:20:20+5:302022-09-09T14:27:34+5:30
लाडक्या गणरायाला गणेश भक्तांकडून निरोप
पिंपरी: अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषात, उत्साह पूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..., अशा घोषणा देत ''पुढच्या वर्षी लवकर...'' या अशी आर्जव करीत लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला.
पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये सकाळपासूनच घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त विसर्जन घाटांवर येत होते. चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट, थेरगाव बिर्ला हॉस्पिटल पूल घाट, रावेत घाट येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
पावसाची उघडीप
पवना घाटावर महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवक, वैद्यकीय सेवक आणि अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यात आली होती. तसेच कृत्रिम हौदही तयार करण्यात आला होता. नदीत गणरायाचे विसर्जन करण्याऐवजी हौदात विसर्जन करावे, असे आवाहन सामाजिक संस्था च्या वतीने करण्यात आले होते. या आव्हानाला सकाळच्या टप्प्यामध्ये प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. आज सकाळपासूनच पावसाने उघडीत दिल्याने गणेश भक्तांचा उत्साह अपूर्व असल्याचे दिसून आले.
चिंचवडला स्वागत कक्ष
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील मिरवणुकीसाठी चाफेकर चौकामध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विसर्जन मार्गावर थेरगाव घाटाजवळ पोलिसांच्या वतीने कक्ष स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले होते. दुपारी दीड पर्यंत पवना नदी घाटावर घरगुती गणरायाचे विसर्जन केले जात होते. गणेशभक्त रिक्षा, टेम्पो स्वतःच्या कारमधून गणरायाला घेऊन नदी घाटावर येत होते. त्या ठिकाणी मनोभावे आरती म्हणून विसर्जन केले जात होते.