Anant Chaturdashi 2022| पिंपरीत गणेश मुर्तींचे हौदात विसर्जन
By नारायण बडगुजर | Published: September 9, 2022 04:53 PM2022-09-09T16:53:55+5:302022-09-09T16:55:21+5:30
पिंपरी गावातील हौदावर गर्दी....
पिंपरी : अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी दुपारनंतर गर्दी केली. पिंपरी येथील सुभाष नगर घाटावर दुपारी चार पर्यंत ९० गणेश मूर्तींचे हौदात विसर्जन झाले.
पिंपरी येथे सुभाष नगर तसेच पिंपरीगाव येथे पवना नदी घाटावर महापालिकेतर्फे विसर्जन हौद उपलब्ध करून दिले आहेत. महापालिका कर्मचारी तसेच स्वयंसेवक येथे नियुक्त आहेत. ते हौदामध्ये विसर्जन करून मूर्तीचे संकलन करीत आहेत. सुभाष नगर येथील घाटावर दुपारी सव्वाचार पर्यंत नव्वद मूर्तींचे विसर्जन झाले. यात घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातर्फे विसर्जन करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्याने गणेश भक्तांमध्ये आनंद होता. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गणेश भक्तांकडून बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
पहिला ट्रक रवाना
हौदात विसर्जन केल्यानंतर मूर्ती संकलित केल्या जात आहेत. संकलित केलेल्या मूर्तींचे महापालिकेच्या वतीने मोशी येथील खाणींमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी संकलित केलेल्या ९० मूर्ती असलेला ट्रक दुपारी चारला मोशी येथे रवाना झाला. टप्प्याटप्प्याने मूर्ती मोशी येथे नेण्याचे नियोजन आहे.
पिंपरी गावातील हौदावर गर्दी
पिंपरी गाव येथे दोन ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी हौद उपलब्ध करून दिले आहेत. घाटावरील महापालिका हौदा ऐवजी या हौदांमध्ये मूर्ती विसर्जनाला गणेश भक्तांकडून पसंती दिली जात आहे. त्यासाठी पिंपरी गावातील या हौदांजवळ देखील नियोजन केले आहे.