Anant Chaturdashi 2022| गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांनी वाजविला ढोल
By विश्वास मोरे | Published: September 9, 2022 02:01 PM2022-09-09T14:01:09+5:302022-09-09T14:04:19+5:30
खासदार बारणे यांनादेखील ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही...
पिंपरी : थेरगावातील सम्राट मित्र मंडळाची गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने, शिस्तबद्धपणे विसर्जन मिरवणूक निघते. खासदार श्रीरंग बारणे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवत ढोल वाजविला. बारणे यांनी ढोल लयबद्ध वाजविल्याने पथकातील सहभागी झालेले वादक, उपस्थितांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला.
खासदार श्रीरंग बारणे संस्थापक, माजी नगरसेवक निलेश बारणे अध्यक्ष आणि विश्वजीत बारणे कार्याध्यक्ष असलेल्या थेरगावातील सम्राट मित्र मंडळाची गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने, शिस्तबद्धपणे विसर्जन मिरवणूक निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मोठ्या उत्साहात सम्राट मित्र मंडळाच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी रात्री झाली.
आरतीनंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. पथकातील वादक मोठ्या उत्साहात आणि जोशात ढोल वाजवत होते. ते पाहून खासदार बारणे यांनादेखील ढोल वाजविण्याचा मोह झाला आणि खासदारांनी कमरेला ढोल बांधला. अतिशय लयबद्ध ढोल वाजविला. मनसोक्त ढोल वाजविण्याचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत खासदार बारणे विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांना प्रोत्साहन देत होते. उपस्थितांनी खासदार बारणे यांच्या लयबद्ध ढोल वाजविण्याचे कौतुक केले. यावेळी युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्यासह कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट होते. त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आमगन झाले. हाच उत्साह आणि जल्लोष गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही दिसून आला. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर भक्तीभावाने बाप्पाला निरोप दिला जात आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथक अतिशय लयबद्ध आणि उत्साहाने ढोल वाजत होते. त्यामुळे मलाही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. कमरेला ढोल बांधून मनसोक्त ढोल वाजविण्याचा आनंद घेतला आणि पथकातील सहभागी वादकांना प्रोत्साहन दिले".