अन् स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:27 AM2018-09-30T01:27:43+5:302018-09-30T01:27:59+5:30
चिमुकला सापडला : वाकडमध्ये गायब झालेल्या मुलाचा तत्काळ शोध लागल्याने पोलिसांसह बालकाच्या नातेवाइकांना आनंद झाला.
वाकड : सार्वजनिक स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडता न आल्याने तब्बल चार तास अडकलेल्या चार वर्षाच्या बालकाला वाकड पोलिसांनी शोधून सुखरूप आई-वडिलांना स्वाधीन केले. दुपारी बाराच्या सुमारास गायब झालेल्या ह्या चिमुरड्याला सुखरूप पाहून त्याच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.
आरोस समाधान मस्के (वय ४, सद्गुरू कॉलनी, वाकड) असे त्या बालकाचे नाव आहे़ सकाळी बाराच्या सुमारास तो घरातून गायब झाला होता़ काही वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या आईने वाकड ठाणे गाठून तक्रार दिली़ त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली़ वाकड पोलिसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले.
हा संदेश सोशल मीडियावरून व्हायरल होत असताना दुसरीकडे वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी या चिमुरड्याच्या शोध मोहिमेसाठी योजना आखली त्यांनी ९० कर्मचारी व १० पोलीस अधिकारी त्याच्या शोधार्थ पाठवून दिले. सहायक निरीक्षक संतोष घोळवे व पोलीस नाईक अशोक दुधावने हे दोघे सद्गुरू कॉलनी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तपासत असताना त्यांनी एका बंद शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा असल्याचे त्यांना दिसले.