अन् ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांना अश्रू झाले अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 11:06 PM2021-01-25T23:06:18+5:302021-01-25T23:08:09+5:30
Krishna Prakash News : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर झाले.
पिंपरी : अकाली निधन झालेल्या वडिलांच्या विरहात एका मुलीने सादर केलेल्या कवितेमुळे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर झाले. मलाही एकच मुलगी आहे. त्यामुळे वडील आणि मुलीचे नाते मला चांगलेच कळते. वडील नसल्याने मुलीला काय वाटत असेल, याचा विचार करून मी भावून झालो, असे कृष्ण प्रकाश यांनी या वेळी सांगितले.
ऋतुजा शांतीलाल पाटील (रा. पळशी, माण, सातारा) असे कविता सादर केलेल्या मुलीचे नाव आहे. सोमवारी (दि. २५) तिने कृष्ण प्रकाश यांची भेट घेतली. ‘झुळूक’ या पुस्तकाबाबत तिने सांगितले. कृष्ण प्रकाश यांनी तिच्याकडून पाच पुस्तके विकत घेतली. त्यानंतर ऋतुजाने देवा घरचा बाबा ही कविता सादर केली. या कवितेतील हृदय पिळवटून टाकणारे शब्द कानावर पडताच कृष्ण प्रकाश भावूक झाले.
कवितेतून करून दिली भावनांना वाट
ऋतुजा लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिला वडिलांची कमी जाणवत राहिली. दैनंदिन जीवनातील अनुभव तिने ‘झुळूक’ पुस्तकात मांडले असून ‘देवा घरचा बाबा’ या कवितेतून तिने भावनांना वाट करून दिली आहे.