...आणि मुलींसाठी तालमीचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू लागले
By Admin | Published: May 7, 2017 02:14 AM2017-05-07T02:14:09+5:302017-05-07T02:14:09+5:30
ग्रामीण भागात मुली आणि कुस्ती हे समीकरण जुळणं थोडं अवघडच; मात्र ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र मुलींच्या
भानुदास पऱ्हाड / लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : ग्रामीण भागात मुली आणि कुस्ती हे समीकरण जुळणं थोडं अवघडच; मात्र ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र मुलींच्या कुस्तीची चर्चा सुरू झाली. परिणामी, बंद पडलेल्या तालमीचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू लागले. ग्रामीण भागातील मुली ‘हम भी छोरों से कहीं कम नही’चा नारा लावत कुस्तीच्या आखाड्यात दंड थोपटू लागल्या.
एकीकडे हा मर्दानी खेळ लोप पावत चालला असताना, कुस्तीक्षेत्रात मुलींचा सहभाग मुलांप्रमाणेच वाढावा व त्यांनी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आळंदीतील जोगमहाराज व्यायाम शाळा या सावित्रीच्या लेकींना खेळाचे धडे देऊन कुस्तीला संजीवनी देण्याचे कार्य करीत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेश गुंड यांनी आळंदीत २००४ मध्ये चार मुलींपासून कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली आहे. सध्या या प्रशिक्षण केंद्रात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तब्बल ७० मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून, राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवत आहेत. सुरुवातीच्या काळात कुस्ती प्रशिक्षणासाठी मुली मिळत नव्हत्या; मात्र गुंड यांनी गावोगावी फिरून मुलींना कुस्तीचे महत्त्व पटवून देऊन त्यांना कुस्ती खेळण्याला प्रवृत्त केले. सोबत स्वत:च्या मुलीलाही कुस्तीचे प्रशिक्षण ते देऊ लागले.
अल्पावधीतच मुलींचा ओढा कुस्तीकडे वाढू लागला. व्यायाम शाळेतील दर्जेदार प्रशिक्षणामुळे नागपूर येथे २००४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चार महिला कुस्तीगीरांनी सुवर्णपदक पटकावून भविष्यातील यशाची रोवलेली मुहूर्तमेढ आजही कायम आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाची मान्यता असलेल्या जोगमहाराज व्यायामशाळेतील २५ महिला रणरागिणींनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकाविले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत.
सब ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत येथील अंकिता गुंडने देशाला सुवर्णपदक, तर मनीषा दिवेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करून दिले आहे. याशिवाय अश्विनी मढवी, शीतल साखरे, तेजस्विनी दहिकर यांसारख्या महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. आजपर्यंत व्यायामशाळेतील २८ महिला कुस्तीगीर पोलीस दलात भरती झाल्या असून, प्रियांका बुरुंगले पोलीस उपनिरीक्षक, गीताई कतोर शिक्षण अधिकारी पदावर काम करत आहेत.
कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियानाच्या फोगाट भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध झाले आहे. त्यावर ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच, हिंदी मालिकांद्वारे खेळाची लोकप्रियता वाढवली जात आहे. त्यांमुळे तरुणींचा कुस्ती खेळाकडे कल वाढत चालला असून, पालकही मुलींना खेळाबद्दल प्रोत्साहन देत आह