...अन् लाभार्थ्यांच्या चेह-यावर फुलले हास्य! महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी सदनिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:08 AM2017-12-16T06:08:58+5:302017-12-16T06:09:08+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे.
पिंपरी : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. घरकुल प्रकल्पातील १२ इमारतींमधील एकूण ५०४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत शुक्रवारी काढली. हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहºयावर हास्य खुलले.
महापालिकेतर्फे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य उत्तम केंदळे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, माजी नगरसदस्या ज्योती भारती, सह शहर अभियंता राजन पाटील, सहायक आयुक्त योगेश कडुसकर, उपअभियंता अजय सूर्यवंशी, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, कार्यालय अधीक्षक महेंद्र चौधरी, मुख्य लिपिक ज्योती पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘ लाभार्थ्यांना त्यांच्या कष्टातून मिळणारे हे घर त्यांनी स्वत: वापरावे. सर्वांनी मिळालेल्या घराचा आनंद कायमस्वरूपी घ्यावा. परिसर स्वच्छ ठेवून ओला व सुका कचरा वेगळा करावा. घरकुलमध्ये वातावरण आनंदी व शांततेत राहील, अशी वातावरणनिर्मिती करावी. घरकुलामध्ये मंडई, उद्याने, दवाखाना, सांस्कृतिक हॉल आदींची निर्मिती केली जाईल. उरलेल्या लाभार्थींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ’’
माणसाला आयुष्यात स्वत:चे व हक्काचे घर असावे अशी अपेक्षा असते व त्या दृष्टीने माणूस मार्गक्रमण करीत असतो. मिळालेल्या सदनिकेचा वापर लाभार्थ्यांनी स्वत: राहण्यासाठी करावा. कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत. घरकुलाच्या अटी व शर्तीचे पालन करावे. सोसायटीमध्ये स्वच्छता, शांतता ठेवावी.
- नितीन काळजे, महापौर