...अन् तेजस्विनी झाली कलावंत
By admin | Published: March 8, 2017 05:00 AM2017-03-08T05:00:14+5:302017-03-08T05:00:14+5:30
पदवीचे शिक्षण घेताना अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पण त्याचे दु:ख करत न बसता अपुऱ्या साधनांच्या जोरावर तिने अभ्यास केला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण
पिंपरी : पदवीचे शिक्षण घेताना अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पण त्याचे दु:ख करत न बसता अपुऱ्या साधनांच्या जोरावर तिने अभ्यास केला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले आणि एवढ्यापर्यंतच न थांबता तिने पदव्युत्तर पदवीही प्रथम वर्गाने ग्रहण केली आणि आज ती नाट्यक्षेत्रात एक सक्षम कलावंत म्हणून अभिनय करीत आहे. ही कथा आहे तळवडेमधील एका सावित्रीच्या लेकीची... तेजस्विनी भालेकरची.
रुपीनगर येथे राहणाऱ्या तेजस्विनीने पदवीपर्यंतचे शिक्षण निगडी येथील डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयात घेतले. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असतानाच तिची दृष्टी अचानक गेली. तरुण वयात डोळ्यांसमोरून जग नाहीसे झाले. मात्र या संकटापुढे गुडघे न टेकता, अपुरी साधने आणि मित्र-मैत्रिणींच्या मदतीने तिने पदवी, पदव्युत्तर शिक्षण प्रथम वर्गाने पूर्ण केले. या दरम्यान तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंध विद्यार्थी कल्याण मंडळामध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षकांच्या मदतीने तिने ब्रेल लिपी आत्मसात केली. त्या प्रशिक्षणाच्या जोरावर ती संगणक हाताळू लागली. फेसबुक, व्हॉट्स अॅपसारख्या माध्यमांचा ती लीलया वापर करू लागली. एम. कॉम. मध्ये मिळालेल्या गुणांच्या जोरावर तिने केंद्र सरकारची राजीव गांधी अधिछात्रवृत्ती मिळविली. या फेलोशिपच्या मदतीने पीएच. डी. करण्याची तिची इच्छा आहे. (प्रतिनिधी)
केवळ दृष्टी नाही म्हणून काळजीपोटी मुलींचे शिक्षण थांबवून घरात बसविणे, हे आजच्या युगात योग्य नव्हे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने या तंत्रज्ञानाच्या जोरावर मुली अशा मात करीत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना शिकण्यास आणि मनसोक्त जगण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कारण त्यांनाही या स्पर्धेत यायचे आहे.
आई-वडिलांकडून पाठबळ अन् प्रेरणा
तेजस्विनीचे विशेष म्हणजे ती केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर तिने अभिनयातही प्रावीण्य मिळविले आहे. कॉलेज जीवनात पथनाट्य सादर करताना लागलेली अभिनयाची गोडी कामी आली आणि आता तेजस्विनी व्यावसायिक नाटकात अभिनय करू लागली. ‘अपूर्व मेघदूत’ या व्यावसायिक नाटकाचे सध्या राज्यभर प्रयोग सुरू आहेत. या नाटकात दामिनीची भूमिका ती साकारत आहे. अंध आहे म्हणून केवळ घरातच बसवून न ठेवता तेजस्विनीला पाठबळ देणारे तिचे आई-वडील इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. डोळस माणसालाही लाजवेल असा ज्ञान आणि अभिनयाच्या क्षेत्रात तेजस्विनीचा मुक्त वावर सुरू आहे.