...अन् डेमू आली बारामतीत
By admin | Published: March 30, 2017 12:22 AM2017-03-30T00:22:50+5:302017-03-30T00:22:50+5:30
बारामती शहरातील रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. २७) रात्री दाखल झालेल्या डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) या लोकल
बारामती : बारामती शहरातील रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. २७) रात्री दाखल झालेल्या डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) या लोकल रेल्वेगाडीचे बारामतीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. प्रायोगिक तत्त्वावर ही रेल्वे बारामती येथे आणण्यात आली. प्रत्यक्षात सध्या सुरू असलेल्या बारामती पुणे पॅसेंजर रेल्वे सेवेशिवाय लोकल रेल्वे सेवेसाठी बारामतीकरांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बारामती रेल्वे स्थानकात प्रथमच आलेली अत्याधुनिक व सुसज्ज असलेली ही रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रेल्वेत बसून, रेल्वेजवळ उभे राहून नागरिकांनी मोबाईलद्वारे ‘सेल्फी’ काढण्याचा आनंद लुटला. या वेळी उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी या वेळी स्टेशन मास्तर प्रकाश गोटमारे व या रेल्वेच्या चालकांचा सत्कार करून या सुविधेचे स्वागत केले. तसेच, बारामती विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक सुनील सस्ते, प्रशांत सातव यांनी स्वागत केले. या वेळी झहीर पठाण, संदीप मोहिते, मुनीर तांबोळी आदी उपस्थित होते.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातील दोन दिवस ही डेमू लोकल बारामतीमध्ये येणार आहे. मात्र, स्वतंत्र सेवा सुरू होण्यासाठी प्रत्यक्ष जुलै महिन्याची वाट पाहावी लागेल. त्यामुळे पुणे-बारामती लोकल सेवा सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे रेल्वे अधिकारी प्रकाश गोतमारे यांनी सांगितले.