दापोडी दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 12:14 PM2019-12-02T12:14:25+5:302019-12-02T12:17:20+5:30
ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात जण दबले गेले होते.
पिंपरी : ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात जण दबले गेले होते. त्यातील पाच जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. रविवारी सायंकाळी घडलेल्या दापोडी दुर्घटनेतील अखेरचा मृतदेह सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढला. त्यानंतर ही शोधामुळे थांबविण्यात आली. या दुर्घटनेत एकूण दोघांचा मृत्यू झाला. महापालिकेचे फायर मन विशाल जाधव आणि नागेश कल्याणी जमादार अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जाधव हे अग्निशामक दलाचे जवान असून जमादार हे मजूर आहेत. रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने जमादार हे दबले गेले, त्यांना काढण्यासाठी गेलेल्या दोन नागरिकांच्याही अंगावर मातीचा ढिगारा पडला. दोन नागरिकांची सुखरुपरित्या सुटका केल्यानंतर अग्निशामक दलाकडून जमादार यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. त्यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. त्यात तीन जवान दबले गेले. यापैकी दोन जवानांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश आले. त्यानंतर विशाल जाधव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफ यांच्या पथकाने पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जमादार यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हे शोधकार्य समाप्त झाले.
या शोध व बचावकार्यात पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, एनडीआरएफ, आर्मी पोलीस, शासन आणि मनपाचा वैद्यकीय विभाग, पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (तहसीलदार), स्वयसेवी संस्था आणि पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, आदी सहभागी होते.