पिंपरीत आणखी एक पोलिस कोरोनाबाधित; रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या चार पोलिसांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 10:42 PM2020-05-25T22:42:18+5:302020-05-25T22:43:55+5:30
शहरात दिवसेंदिवस कोरोनारुग्ण संख्येत भर..
पिंपरी : कोरोनाबाधित नागरिकांची संख्या वाढत असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एका पोलिसाला धोरणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरातील पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या आठ झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सर्वत्र हाहाकार माजविला असतानाच १५ मे रोजी शहर पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर सातत्याने पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनारुग्ण संख्येत भर पडत आहे. त्यातच पोलीसही कोरोना बाधित होत असल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचे कोरोना तपासणीचे रिपोर्ट सोमवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आले आहेत. तर सोमवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. चार दिवस होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने साडेतीनशेचा टप्पा पार केला आहे. पोलिसांचा थेट नागरिकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांना लागण होणे शहर पोलीस दलासाठी चिंतेची बाब आहे. मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांची सुरक्षा महत्त्वाची मानली जात आहे.