Talawade Fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
By विश्वास मोरे | Published: December 17, 2023 02:25 PM2023-12-17T14:25:10+5:302023-12-17T14:26:24+5:30
तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १४ इतकी झाली आहे
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी (वय ४० वर्षे) यांचे आज सकाळी पावणे दहा वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या घटनेबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असुन कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
तळवडे येथील एका कारखान्यामध्ये दि. ८ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे दि.१४ डिसेंबर रोजी तर कमल चौरे ( वय ३५ वर्षे) आणि सुमन गोधडे (वय वर्षे ४० वर्षे) यांचे दि.१६ डिसेंबर रोजी उपचादरम्यान ससून रुग्णालयामध्ये निधन झाले. आज आणखी एका जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १४ इतकी झाली आहे.
दरम्यान, नातेवाईकांनी केलेल्या विनंतीवरून या घटनेतील जखमी रुग्ण रेणुका ताथोड यांना ससून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असुन त्यांना पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी अमरावती येथे नेले आहे. तसेच या घटनेतील गुन्हा दाखल असलेल्या जखमी रुग्ण शरद सुतार यास ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.