महाविद्यालयांत ‘अॅण्टिरॅगिंग’ प्रतिज्ञापत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:40 AM2017-08-18T01:40:14+5:302017-08-18T01:40:17+5:30
पालकांना ‘अॅण्टिरॅगिंंग अॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे.
पिंपरी : विविध प्रवेश परीक्षा झाल्या, त्यानंतर महाविद्यालय प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेश होईपर्यंत कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावाधाव केल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला जात असताना, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच पालकांना ‘अॅण्टिरॅगिंंग अॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी रॅगिंंग करीत असल्याने अनेकदा आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. रॅगिंंगमुळे विद्यार्थी एकाकी पडल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांचाही रॅगिंंगच्या माध्यमातून छळ केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. असे अनुचित प्रकार शैक्षणिक संस्थांमध्ये घडू नयेत, यासाठी देशातील सर्व विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यासंबंधीचे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे पाऊल महाविद्यालयांनी उचलले आहे.
या प्रतिज्ञापत्रात विद्यार्थ्याला त्याची माहिती, त्याचे पालक अथवा पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी लागते. त्यात दिलेल्या नियमावलीनुसार चांगल्या वर्तणुकीची हमी दिली जाते. तसेच रॅगिंंगच्या कसल्याही कृत्यात सहभागी होणार नाही, असे लिहून द्यावे लागते. अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी झाल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जावी.
महाविद्यालय व्यवस्थापनाकडून प्रवेश रद्द केला जाऊ शकतो,
याची जाणीव असल्याचे, तसेच दिलेली माहिती खरी असून नियमावली मान्य आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करणे बंधनकारक आहे.
ना हरकत, संमतीपत्र
आमच्या पाल्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास महाविद्यालय व्यवस्थापनाकडून केल्या जाणाºया कारवाईबद्दल आमची काही हरकत नसेल, असे पालकांचे संमतीपत्रही घेतले जात आहे. काही महाविद्यालयांमध्ये अॅण्टिरॅगिंंग समितीसुद्धा स्थापन झाल्या आहेत. या समितीकडे विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीची तक्रार आल्यास नियमानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया केली जाते.
अॅण्टिरॅगिंग कमिटीचा अभाव
शहरातील बहुतांशी महाविद्यालयांमध्ये अॅण्टिरॅगिंग समिती स्थापन झाल्या आहेत. काही महाविद्यालयांतील समित्या केवळ कागदावरच आहेत. अनेक महाविद्यालये तर अशी काही समिती असते, याबद्दलच अनभिज्ञ आहेत. अॅण्टिरॅगिंग प्रतिज्ञापत्रांमुळे त्यांना आता याचे महत्त्व लक्षात आले असून, समिती स्थापन्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.