पिंपरी - चिंचवड, मावळातील चिंता मिटली; पाणी कपातीचे संकट टळले, पवना ५८.४५ टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:22 AM2023-07-24T11:22:07+5:302023-07-24T11:22:43+5:30
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ७४.२४ टक्के इतका होता
पवनानगर : पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील पाणी कपातीचे संकट टळले. रविवारी (दि. २३) दुपारी तीनच्या आकडेवारीनुसार पवना धरण ५८.४५ टक्के भरले आहे. पिंपरी चिंचवड शहराला व मावळ तालुक्यात पाण्याचा मुख्य स्रोत असलेले पवना धरण रविवारी ५८.४५ टक्के भरले असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
मावळात पावसाचे अर्धशतक झाले असून, पवना धरण ५८.४५ टक्के भरले आहे. धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या २४ तासांत १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून १२५० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे, तर दिवसभरात १५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेस १४९९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. पाणी साठ्यात अर्धशतक पूर्ण झाले असून, धरणातील सध्याचा पाणीसाठा ५८.२७ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ७४.२४ टक्के इतका होता. पाऊस जोरदार सुरू असल्याने धरणातील येवा वाढला असून, पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे.