स्वच्छ, सुंदर शहरासाठी पुढे या, महापालिकेकडून आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:37 AM2017-12-20T04:37:46+5:302017-12-20T04:38:00+5:30
शहराची स्वच्छता राखणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.
पिंपरी : शहराची स्वच्छता राखणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने विकसीत केलेल्या स्वच्छता अॅपचा वापर करून त्याद्वारे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सह आयुक्त तथा स्वच्छ शहर संचालक दिलीप गावडे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने व राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी यांच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या स्वच्छता अभियान रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी नगरसदस्य विक्रांत लांडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, प्रा. श्रेया दाणे, सविता वीर, जयश्री आरमणी, मारुती शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात राजमाता जिजाऊ महाविद्यालयापासून झाली. या रॅलीचा मार्ग लांडेवाडी चौक, सावित्रीबाई फुले शाळा, गव्हाणे वस्ती परिसर व पुन्हा राजमाता जिजाऊ महाविद्यालय असा होता. या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. रॅलीमध्ये स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहराबाबत घोषणा देण्यात आल्या. ही रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
काही जण विद्यार्थी देत असलेल्या घोषणांना प्रतिसादही देत होते.
महापालिकेचे सहायक आयुक्त बोदडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छताविषयक अॅपची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार प्रा. दीपक पावडे यांनी मानले.
मंगळवारी सांगवी येथील बाबूराव घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी महापालिकेच्या सहकार्याने परिसरात रॅली काढत स्वच्छताविषयक जनजागृती केली. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या माधवी राजापुरे, सीमा चौगुले, सह आयुक्त तथा स्वच्छ शहर संचालक दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब झावरे, उपप्राचार्य डॉ. लतीश निकम, डॉ. शिवाजी ढगे, प्रा. डॉ. नरसिंग गिरी, प्रा़ स्वप्निल जगताप, ज्ञानेश्वर जांभूळकर, विठ्ठल नाईकवडे, विजय घारे, प्रवीण येवले, विद्या पठारे, अमृता इनामदार, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात घोलप महाविद्यालयापासून झाली़ फेमस चौक, शिवाजी चौक, कृष्णा चौक व साई चौकापासून पुन्हा महाविद्यालय असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘अब ना रहेगी हगणदरी, हमने ली है जिम्मेदारी’, ‘स्वच्छतेची कास धरू, पिंपरी-चिंचवड स्वच्छ करू’, ‘स्वच्छ भारत आमचा नारा, रोगराईला नाही थारा’ अशा स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीपर घोषणा दिल्या.