दहीहंडी उत्सवासाठी शांततेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:33 AM2018-08-30T01:33:41+5:302018-08-30T01:34:12+5:30
येत्या सोमवारी (३ सप्टेंबर)साजरा होत असलेला येथील सार्वजनिक दहीहंडी उत्सव शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था राखून साजरा व्हावा
तळेगाव दाभाडे : येत्या सोमवारी (३ सप्टेंबर)साजरा होत असलेला येथील सार्वजनिक दहीहंडी उत्सव शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था राखून साजरा व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी सतर्क झाले असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.
या वर्षी गाव विभाग व तळेगाव स्टेशन भागात पाच ते सहा ठिकाणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दहीहंडीचे कार्यक्रम होणार आहेत. दहीहंडी उत्सवात होणारी नागरिकांची गर्दी, बाहेरून येणारी गोविंदा पथके, सिने व नाट्यक्षेत्रातील तारका,त्यांना पाहण्यासाठी होणारी गर्दी, तसेच अनेक अनोळखी व्यक्तींची रीघ पाहता कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस अधिकारी आणि आयोजकांनी घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
याबाबत मंगळवारी झोन-२च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव,येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि सहकाऱ्यांनी दहीहंडी कार्यक्रमांच्या सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. लोकांची गर्दी, वाहतूककोंडी, महिला प्रेक्षकांची सुरक्षितता आणि स्टेज, क्रेन आदीबाबत काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी विविध सार्वजनिक दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांना केल्या.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा समावेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन पोलिसांनी केल्याबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तळेगाव स्टेशन सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीचे संस्थापक तथा माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, अध्यक्ष कौस्तुभ भेगडे आणि मंडळ सदस्यांकडूनही कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येणार असून, त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्याचे गणेश काकडे यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस ठाण्यात शहरातील सार्वजनिक दहीहंडी मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी घेतली.या वेळी नम्रता पाटील , श्रीधर जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दहीहंडी काळात डॉल्बी सिस्टीम कोणीही वापरू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.