पिंपरी : शहरातील ४२ हजार ४८६ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:50 IST2024-12-07T15:49:13+5:302024-12-07T15:50:56+5:30
योजनेसाठी तब्बल ४ लाख ३३ हजार अर्ज : शहरात तीन लाख ९० हजार लाडक्या बहिणी

पिंपरी : शहरातील ४२ हजार ४८६ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद
पिंपरी :महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ४ लाख ३२ हजार ८९० तरुणी व महिलांनी अर्ज भरले. त्यांपैकी ३ लाख ८९ हजार ९२० महिला लाडक्या ठरल्या आहेत. त्यांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे; तर, ४२ हजार ४८६ अर्ज बाद केले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य केले जाते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक ६५ हजार ८७१ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पांजरपोळ, भोसरी येथील ई-क्षेत्रीय कार्यालयात ६३ हजार १०६ आणि थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात ६० हजार ३३ महिलाचे अर्ज योग्य ठरले आहेत. तर, निगडी येथील फ-क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वाधिक १० हजार ८२९ अर्ज बाद करण्यात आले आहेत. पाठोपाठ ड-क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ७ हजार ६२ अर्ज बाद झाले आहेत.
आवश्यक कागदपत्रे नसणे, पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील, मर्यादेपेक्षा उत्पन्न अधिक, एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे, आदी कारणांनी हे बाद करण्यात आल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली.