अतिरिक्त आयुक्तपदी अच्युत हिंगे यांची नियुक्ती
By admin | Published: June 2, 2017 02:26 AM2017-06-02T02:26:59+5:302017-06-02T02:26:59+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची सूत्रे तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी स्वीकारली. मावळते
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची सूत्रे तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी स्वीकारली. मावळते अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची बदली वन व महलूस विभागात करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून बदलीचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले अच्युत हांगे यांनी यापूर्वी मिरा -भाईंदर महापालिकेच्या मुख्याधिकारीपदी काम केले आहे. त्यांनी नागपूर, भिवंडी, अहमदनगर या महानगरपालिकेत विविध पदांवर काम केले आहे. नागपूर महापालिकेत महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या कार्यकाळातही तीन महिने प्रशासन सेवा केली आहे. हांगे हे बीड जिल्ह्यातील हांगेवाडी येथील आहेत. तानाजी शिंदे हे ३० जून २०१३ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झाले होते. पंधरा वर्षांपूर्वीदेखील पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी सहायक आयुक्त पदावर काम केले आहे. महापालिकेत शासनाने त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवले होते.
प्रशासन अधिकारीपदी आशा राऊत
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारी जयश्री रवींद्र काटकर यांची बदली जुन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी झाली आहे. तर महाबळेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारीपदी बदली केली आहे. महापालिकेत राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेले आठ अधिकारी आहेत.