मुख्यमंत्र्यांसाठी साडेसात कोटींचा ऐन वेळसचा विषय मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 09:26 PM2017-11-15T21:26:44+5:302017-11-15T21:27:04+5:30
पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे.
पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी दोन वर्षांसाठी येणा-या सुमारे साडेसात कोटींच्या ऐनवेळसच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. आॅफिसच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाने हा विषय ऐनवेळी आणण्यात आल्याचे स्थायी समिती सभेत सांगण्यात आले. नियोजन आणि अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साडेसात कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. यावेळी सिटी ट्रान्फॉरमेशन आॅफीसची निर्मितीचा ऐनवेळसचा प्रस्ताव प्रशासनाने आणला. त्यावेळी विषयपत्रिकेवर विषय का आणला नाही, याबाबत विचारणा केली. त्यावर संबंधित कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करायचे आहे, मंजूरीस विलंब झाला तर उद्घाटनास उशीर होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले. त्यामुळे हा विषय मंजूर केला आहे.
दोन वर्षांसाठी नियुक्ती
महापालिकेमार्फत राज्य व केंद्र सरकारच्या अभियानाअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात 'सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफीस' हे नवीन लेखाशिर्ष निर्माण केले आहे.त्यासाठी 'पॅलाडिअम' सल्लागार संस्थेची दोन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. जेएनएनयुआरएम, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी अभियान, पंतप्रधान अवास योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प कालमर्यादेत व वेळेत पूर्ण करण्यासाठी या कामांकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. त्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात 'सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफीस' हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अर्थसंकल्पात महसुली जमा खर्चात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नवीन लेखाशिर्ष निर्माण केले आहे. डीसीएफ आणि पॅलाडिअम सल्लागार संस्थेची दोन वषार्साठी नियुक्ती केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, संस्था १२० देशामध्ये काम करत असून शहर विकासाचे नियोजन करणार आहे. प्राधान्याने प्रकल्प कोणते हाती घ्यायचे हे निश्चित करेल. महापालिकेला मदत करण्यासाठी या संस्थेची नियुक्ती केली आहे. स्मार्ट सिटीप्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी फायदा होणार आहे. या संस्थेची दोन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे. त्यांचे काम चांगले असल्यास त्यांना पुन्हा मुदत वाढ देऊ. सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफीस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.