वादग्रस्त लटकत्या कुड्यांना मंजुरी
By admin | Published: May 12, 2017 05:17 AM2017-05-12T05:17:15+5:302017-05-12T05:17:15+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारतअभियानांतर्गत शहरातील ५६२ ठिकाणी लटकत्या कुंड्या (हँगिंग लिटरबीन्स) बसविण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारतअभियानांतर्गत शहरातील ५६२ ठिकाणी लटकत्या कुंड्या (हँगिंग लिटरबीन्स) बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार कुंड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. दक्षता समिती मार्फत दरपृथक्करण करावे, असे आदेश प्रशासनास देण्यात आले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील ५६२ ठिकाणी हँगिंग लिटरबीन्स बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार ५६२ हँगिंग लिटरबीन्स खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. एका कुंडीसाठी सुमारे २९३०० रुपये खर्च अपेक्षित होता. दरावरून हा विषय वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे स्थायी समिती याबाबत कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले होते. कुंड्या सिमेंट काँक्रीटमध्ये बसविले जाणार आहेत. त्यामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याची सुविधा असणार आहे. नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच तो हँगिंग लिटरबीन्समध्ये टाकणे अपेक्षित आहे. ५६२ ठिकाणी हँगिंग लिटरबीन्स बसविल्यानंतर त्यांच्या पाच वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदारच करणार आहे.