आठ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By admin | Published: May 22, 2017 04:55 AM2017-05-22T04:55:34+5:302017-05-22T04:55:34+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १६ आकुर्डी येथे केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत उद्यान विकसित करण्यात येणार असून
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १६ आकुर्डी येथे केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत उद्यान विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी येणाऱ्या सुमारे ८३ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ८ कोटी १६ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या़
केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत उद्यान विकसित करण्यासाठी आराखडा महानगरपालिकेने तयार करून तो शासनाकडे पाठविला होता. त्यामध्ये ५० टक्के केंद्र शासनाचा, २५ टक्के राज्य शासनाचा व २५ टक्के महानगरपालिकेचा सहभाग आहे. या उद्याना अंतर्गत लँड स्केपिंग, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान व ४०० झाडांचे वृक्षलागवड या परिसरात करण्यात येणार आहे. यासाठीच्या खर्चास या वेळी मान्यता दिली.
महापालिका हद्दीतील एकूण ४१ स्मशानभूमी, दफनभूमीच्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षा ठेवण्यासाठी काळजीवाहक नेमण्यासाठी येणाऱ्या सुमारे ५५ लाख ७० हजारांच्या खर्चास स्थायीच्या बैठकीत मान्यता दिली. ६ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४ कोटी ५८ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. अ क्षेत्रीय कार्यालयातील वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी येणाऱ्या सुमारे ६६ लाख ९८ हजारांच्या खर्चास मान्यता दिली.