पिंपरीत १५ कोटी २३ लाखांच्या विकासकामांना मंजुरी; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता १ हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 08:40 PM2020-09-16T20:40:28+5:302020-09-16T20:46:05+5:30
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडणार महागात
पिंपरी : शहरामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणेकामी सार्वजनिक परिसरामध्ये थुंकणाऱ्या व्यक्तींविरुध्द रक्कम रुपये १ हजार इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पवना जलवाहिनीसाठी सल्लागार नियुक्तीच्या विषयासह पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे १५ कोटी २३ लाख रूपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरीत स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. विषय पत्रिकेवर ३० विषय होते. त्यात पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर क्रमांक २३ जलशुध्दीकरण केंद्र निगडीपर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन टाकणेच्या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा विषय होता. हा विषय प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजपा त्यास मंजूरी देणार की नाही? याबाबत उत्सुकता होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी पवना जलवाहिनीसाठी सल्लागार नियुक्तीच्या विषयास मान्यता देण्यात आली.
चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चाफेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिर पासूनचे थेरगाव बोटक्लब पर्यंतचा परिसर सुशोभित करण्याच्या सुमारे ९ कोटी १ लाख रुपयांच्या खर्चास, मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठीच्या सुमारे १ कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चास, सुरक्षा विभागामार्फत ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या उपक्रमान्वये सुरक्षा व्यवस्था करण्यासाठीच्या सुमारे ५५ लाख ७ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महापालिकेच्या विविध विभागास आवश्यक छपाई साहित्य खरेदी करण्यासाठीच्या सुमारे १ कोटी २२ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.
.........
स्वच्छतागृहांची स्वच्छता
महापालिका प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ प्रभागासाठी १३२८ सार्वजनिक स्वच्छतागृहे व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने व मनुष्यबळाव्दारे दैनंदिन साफसफाई, देखभाल व किळकोर दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या सुुमारे ३० लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महानगरपालिका ह क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी काविड १९ आपत्ती व्यसस्थापनासाठी प्रकाश व्यवस्था, जनित्रसंच, सी.सी.टीव्ही व अन्य विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे २९ लाख ३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.
..........
झोपडपट्टी पुर्नवर्सन इमारत दुरूस्ती
शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत मिलिंदनगर येथील प्रकल्पामधील इमारतीच्या दुरुस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे २ कोटी २७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.