पिंपरी महापालिकेकडून पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 08:19 PM2019-01-04T20:19:41+5:302019-01-04T20:21:13+5:30
शुक्रवारच्या सभेत सुमारे पावणे चारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. वर्षांतील मंजुरीचा हा उच्चांक आहे.
पिंपरी : महापालिकेतील स्थायी समितीची सभा सलग दोनवेळा तहकूब केली आहे. विषयपत्रिकेवर सुमारे दोनशे कोटींच्या विकासकामांचे विषय आहेत. विषयांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने सभा तहकूब केली जात होती. शुक्रवारच्या सभेत सुमारे पावणे चारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. वर्षांतील मंजुरीचा हा उच्चांक आहे. आळंदी पुणे रस्ता, समाविष्ठ गावांतील रस्ते विकासाची कामे, तसेच पंतप्रधान आवास योजनांच्या पिंपरी आणि आकुडीर्तील गृहयोजनेचा विषय मंजूर करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची २६ डिसेंबरची सभा गणसंख्येअभावी तहकूब केली होती. तर नियमितपणे मंगळवारी होणारी सभा अभिनेते कादर खान आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभा शुक्रवारपर्यंत तहकूब केल्या होत्या.
सबळ कारण नाहीच
कोणतेही सबळ कारण न देता सलग दोनवेळा स्थायी समितीची सभा तहकूब केली आहे. यामुळे आवास योजनेसह विविध महत्त्वाचे विषय लांबणीवर पडले होते. तर मागील सभेत आयत्यावेळी महापालिकेच्या महत्त्वाच्या मिळकतींवर डॉग स्कॉडमार्फत सुरक्षा व्यवस्था करणे, महापालिकेच्या रुग्णालयातील डी. आऱ सिस्टिमकरिता एक्स-रे फिल्म खरेदी करणे, पवनाथडी जत्रेच्या सभा मंडपासाठी ३२ लाख देणे असे विविध विषय दाखल केले आहेत. सभा तहकुबीची कारणे काहीही देण्यात येत असली तरी सत्ताधाºयांमध्ये एकमत होत नसल्याने सभा तहकूब केल्याचे वास्तव आहे. आजची सभा होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र, सत्ताधाºयांत विषयाबाबत एकमत झाल्याने दोन्ही सभांचे कामकाज झाले.
२६ तारखेच्या तहकूब सभेत ७६ विषय मंजूर करण्यात आले. त्यात सात विषय अवलोकनाचे होते. या सभेत एकूण २०३ कोटी ५४ लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तर एक जानेवारीच्या तहकूब सभेतील एकूण ४३ विषय मंजूर करण्यात आले आहेत. अवलोकनाचे आठ विषय होते. ते विषय सुमारे अकरा कोटींचे होते. त्यापैकी मागील सभा तहकुबीपूर्ण ऐनवेळी तेरा विषय दाखल करून घेण्यात आले होते. स्थायी समिती सभेत १५४ कोटी, ११ लाख ९२ हजारांचे विषय मंजूर करण्यात आले.
मंजूरी दिलेले विषय
१)आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्प (८४ कोटी)
२) वायसीएमए रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे (३२ कोटी)
३) च-होली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी अठरा मीटर रस्ता विकसित करणे (२० कोटी)
४) विशालनगर जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुला पर्यंतचा रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे (१४ कोटी)
५) आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वार चौकापर्यंतचा अठरा मीटर रस्ता अर्बन डिझाईननुसार विकसित करणे (आठ कोटी ९१ लाख रुपये)
६) पुणे आळंदी रस्ता भाग एक आणि दोन - ८२ कोटी
७) प्रभाग सहामध्ये २५ कोटी, विशालनगर येथे १३ कोटी, आकुर्डीत चोवीस मीटर रस्त्यासाठी ११ कोटी
८) वायसीएम हॉस्पीटलमध्ये नवजात अर्भक विभाग नुतनीकरण- ३१ कोटी
९) प्रभाग सात अठरा मीटर रस्ता- २० कोटी.