तुमची जिन्स पॅन्ट बनावट नाही ना? बाजारात बनावट ‘लोगो’ वापरून विक्री सुरू
By नारायण बडगुजर | Published: August 9, 2022 09:30 AM2022-08-09T09:30:13+5:302022-08-09T09:31:05+5:30
ग्राहकांनी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून...
पिंपरी : आपण खरेदी करीत असलेले नामांकित कंपनीचे उत्पादन बनावट तर नाही ना, याची खातरजमा करणे आवश्यक झाले आहे. यात खाद्य पदार्थांसह मोबाईल फोन, घड्याळे, जिन्स पॅन्ट, कपडे, बुट अशा दररोजच्या वस्तूंचा समावेश आहे. नामांकित कंपन्यांचा लोगो तसेच नाव वापरून वस्तू विक्री होत असल्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी काही नामांकित कंपन्या गुणवत्तापूर्ण उत्पादन करतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्याला मोठी मागणी असते. याचाच गैरफायदा घेत काही जणांकडून बनावट किंवा दर्जा नसलेल्या वस्तू संबंधित नामांकित कंपनीच्या नावाने विक्री केल्या जातात. सामान्य ग्राहकांना ते ओळखणे सहज शक्य होत नाही. यातून संबंधित ग्राहकाची फसवणूक होते. तसेच मूळ कंपनीच्या नाव व लोगोचा गैरवापर होऊन त्यांचीही फसवणूक होते. तसेच बनावट वस्तूमुळे कंपनीबाबत गैरसमज होतो.
‘झेराॅक्स’ काढून कायद्याचा भंग
लेखक, साहित्यिक यांच्या कविता, कादंबरी, पुस्तके यांच्या साहित्यकृती किंवा पुस्तकाच्या झेराॅक्स काढून त्याची विक्री केल्याचा प्रकार पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे उघडकीस आला होता. काॅपीराईटप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. प्रकाशन संस्था किंवा कंपनी यांनी छापलेल्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या झेराॅक्स करून त्याच्या विक्रीचा प्रकार यातून समोर आला होता.
कपड्यांसाठी बनावट ‘लोगो’
पिंपरी येथे काही व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानात नामांकित कंपनीच्या लोगो व नावाचा वापर करून जिन्स पॅन्ट तसेच इतर कपडे विक्रीसाठी ठेवले होते. तसेच काही व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करून विक्री केल्याचे समोर आले. यावरून गुन्हे दाखल करण्यात आले. याच
ग्राहकांकडून तक्रार नाहीच...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत काॅपीराईट प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींकडून तक्रार देण्यात आली आहे. त्यांच्या कंपनीच्या नाव व लोगोचा गैरवापर होत असल्याने त्यांनी तक्रार दिली. मात्र, याप्रकरणी ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. ‘काॅपीराईट’चा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
काय आहे स्वामित्व कायदा?
बौद्धिक संपदेचा अधिकार म्हणजे स्वामित्त कायदा होय. लेखकाच्या किंवा निर्मात्याच्या त्यांनी निर्माण केलेल्या मूळ कार्यांचे संरक्षण करणे म्हणजे काॅपीराईट कायदा. स्वत: तयार केलेल्या गोष्टींवर त्या तयार करणाऱ्यास या कायद्यानुसार मालकी हक्क मिळतो. या कायद्यात सर्वकाही येऊ शकते. कलाकृती, कविता, कादंबरी, पेंटिंग, चित्रपट, व्हिडिओ, संगीत, गाणी, म्युझिक रेकॉर्डिंग, संगणक प्रणाल्या, पुस्तके, वेबसाईट्स, यासह ज्याची स्वत: कोणी निर्मिती केली आहे असे सर्व काही यात येते. यात एक व्यक्ती, संस्था, संघटना, कंपनी, आस्थापना यांचा समावेश असू शकतो. एखाद्या वस्तूची, गोष्टीची मालकी त्यांच्याकडे असू शकते. या मालकीचे संरक्षण कायदेशीर करणे म्हणजेच काॅपीराईट कायदा होय.
‘काॅपीराईट’ प्रकरणी दाखल गुन्हे
वर्ष - दाखल गुन्हे
२०१९ - ७
२०२० - १
२०२१ - २
२०२२ (जूनअखेर) - ३
ग्राहकांनी सजग असले पाहिजे. नामांकित कंपनीच्या नावात किरकोळ बदल करून वस्तू विक्रीचे प्रकार होतात. त्यासाठी ग्राहकांनी ‘ब्रॅंडनेम’, ‘लोगो’ आदीबाबत खात्री करून घ्यावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही.
- मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, पिंपरी-चिंचवड