वाघजरीच्या घनदाट जंगलात लपून बसलेल्या अट्टल चोरट्याला अटक; लोणावळा पोलिसांची चित्तथरारक कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 08:44 PM2020-08-21T20:44:43+5:302020-08-21T20:45:14+5:30
पुणे शहर परिसरात त्याच्यावर विविध प्रकारचे सुमारे 60 ते 70 गुन्हे दाखल
लोणावळा : खंडाळा येथील वाघजरीच्या डोंगरात एका कपारीत तळ ठोकून बसलेल्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलिसांनी चित्तथरारक कामगिरी करत अटक केली. पुणे शहर परिसरात त्याच्यावर विविध प्रकारचे सुमारे 60 ते 70 गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
बिभीषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय ४२, रा. २२०, मंगळवार पेठ, पुणे) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.
खंडाळा येथे एका बंगल्यातील किंमती व जुन्या काळातील ऐवजांची चोरी झाली होती. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणावळा शहर स्थानिक गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती समजली की एक अट्टल चोरटा नागफणी सुळक्याच्या मागील बाजुला असलेल्या वाघजरीच्या डोंगरात घनदाट जंगलात एका कपारीत तळ ठोकून बसला आहे. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस काॅन्स्टेबल राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, अजीज मेस्त्री, मनोज मोरे व पोलीस मित्र यांनी सशस्त्र व सर्व बचावात्मक साहित्यांनिशी भरपावसात वाघजरीच्या डोंगरात शोध मोहिम सुरू केली. आकाशातून कोसळणारा जोरदार पाऊस, अंगाला बोचणारा वारा, जंगलात झाडा झुडपांमधून वाट काढत सलग दोन तासाची पायपिट करून बाब्या जगतापचा ठावठिकाणा शोधून काढला, मात्र त्याच्याकडे कोणते शस्त्र आहे याची कल्पना नसल्याने पथकाने सर्व खबरदारी घेत सापळा रचत बाब्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता पुणे परिसरात त्याच्यावर 60 ते 70 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक वैभव सुरवसे हे करत आहेत.