पिंपरीत तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या; दोन पिस्तूलासहित पाच काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:50 PM2021-06-22T18:50:19+5:302021-06-22T18:50:27+5:30
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली
पिंपरी: पिंपरीत दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतूस जप्त करण्ह्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली.
मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कोरबू (वय २३, रा. ओटास्कीम, निगडी), असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी रावण गॅंगच्या गुंडांनी आकाश दोडमणी या तरुणावर गोळीबार केला. त्याच्या पायावर गोळी लागली होती. दोडमणी हा कोरबू गॅंगचा सदस्य आहे. आपल्यावरही गोळीबार होऊ शकतो, या भीतीने मोहम्मद कोरबू यानेही पिस्तूल बाळगले होते.
खंडणी विरोधी पथकाकडून सांगवी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रेकॉर्डवरील तडीपार गुंड मोहम्मद कोरबू हा औंध ऊरो रुग्णालयाच्या मागील बाजूस थांबलेला आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे आढळून आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. कोठडीत असताना एकूण ८१ हजार रुपये किमतीची दोन पिस्तूल व पाच काडतुसे त्याच्याकडून हस्तगत केली. आरोपी मोहम्मद कोरबू याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारमारी असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते.