गडकोट, किल्ल्यांवरून शिवज्योतींचे आगमन
By admin | Published: February 20, 2017 02:09 AM2017-02-20T02:09:51+5:302017-02-20T02:14:26+5:30
शहरासह नाणे, पवन, आंदर मावळ व आजूबाजूच्या गावांमध्ये तरुण मंडळ व युवकांच्या वतीने शिवजयंतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
कामशेत : शहरासह नाणे, पवन, आंदर मावळ व आजूबाजूच्या गावांमध्ये तरुण मंडळ व युवकांच्या वतीने शिवजयंतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. मावळातील विविध किल्ल्यांवरून शिवभक्तांनी सकाळी ढोल-ताशाच्या गजरात शिवज्योती आणल्या.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचार बाजूला सारून शिवजयंती साजरी करण्यासाठी वेळ काढला. शिवज्योती आणताना कोणत्याही उमेदवाराचा प्रचार न करता छत्रपती शिवाजीमहाराजांचाच जयघोष केला.
शिवज्योती आणताना भगवे झेंडे व शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. परिसरातील महिलांनी शिवज्योतीची आरती ओवाळली. नागरिक व ग्रामस्थांनी शिवज्योतीचे स्वागत केले. शिवप्रतिमा व शिवज्योतीचे विधिवत पूजन करून शिवाजीमहाराजांच्या स्मृतींना उजाळा देणात आला.
शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गावात मिरवणूक काढून शिवस्मारकावर फुलांची आरास व परिसरात लावलेले भगवे झेंडे यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत होते. परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल, ताशा आणि इतर वाद्य व शिव घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
आंदर मावळात उत्साह
टाकवे बुद्रुक : आंदर मावळात निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घेत परिसरात साध्या पद्धतीने मात्र उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील बाळराजे युवा मित्र मंडळाने भंडारा डोंगरावरून शिवज्योत आणली. येथील शिवस्मारकावर फुलाची सुंदर सजावट करण्यात आली होती. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस योगेश मोढवे, नंदू असवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पांडुरंग असवले, सुरेश असवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंगेश काकरे, स्वप्निल असवले, संकेत असवले, चैतन असवले, समीर असवले, फिरोज आत्तार, ललित प्रजापती, आदिनाथ असवले, रंजित असवले, विश्वनाथ असवले, ललित ओसवाल, नवनाथ मालपोटे,अमोल जांभूळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता असवले यांनी केले. संदीप ओसवाल यांनी आभार मानले. सायंकाळी छत्रपती शिवाजीमहाराज व जिजाऊ यांच्या प्रतिमेची ढोल-तशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.