पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश
By नारायण बडगुजर | Published: May 11, 2024 05:39 PM2024-05-11T17:39:43+5:302024-05-11T17:40:26+5:30
मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निर्बंध असणार आहेत...
पिंपरी : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेचे पुणे, शिरूर व मावळ या मतदारसंघातील काही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. निवडणुका सुरळीत, शांततेत पार पडण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता (सीआरपीसी) कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निर्बंध असणार आहेत. हे आदेश मंगळवारी (दि. १४) रात्री बारा पर्यंत लागू असणार आहेत.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ नुसार कायदेशी कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे. कायद्याचे उल्लंघन होईल, असे कोणतेही न करता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील पोलिस आयुक्त चौबे यांनी केले आहे.
खालील बाबींसाठी निर्बंध असतील -
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रिसायडींग अधिकारी, निवडणूक कामकाज संदर्भाने नेमलेले शासकीय व्यक्ती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेले शासकीय व्यक्ती ज्यांना निवडणूक संदर्भाने संपर्क करणे आवश्यक आहे. यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मोबाईल फोन, स्मार्ट फोन, वायरलेस किंवा संपर्क साधने वापरण्यास मनाई आहे.
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात तात्पुरत्या स्वरुपाचे पक्ष कार्यालय कोणत्याही धार्मिक, शैक्षणिक आस्थापनेत किंवा किंवा अतिक्रमण करून उभारण्यास मनाई आहे. संरक्षण प्राप्त व्यक्तीना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सुरक्षा रक्षकासह प्रवेश करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या २०० मीटर आतमध्ये इलेक्शन बुथ लावता येणार नाही. एका इमारतीत एकापेक्षा जास्त मतदान बुथ असतील तरी देखील त्या इमारतीसाठी एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त बुथ लावता येणार नाही.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर क्षेत्रामध्ये प्रचार करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या २०० मीटर त्रिज्यामध्ये वाहन आणण्यास मनाई आहे. लाऊड स्पीकर, मेगाफोन, आरडाओरडा करणे, गोंधळ करणे, दुवर्तन करणे, अशा प्रकारास मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आहे. मतदान समाप्ती करीता निर्धारीत केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते वा प्रचार कार्यकर्ते त्यांना त्या मतदारसंघात थांबण्यास मनाई असेल.
मतदान समाप्ती करीता निर्धारीत केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून राजकीय प्रचार करण्याच्या उद्देशाने कोणतेही बल्क मेसेज पाठविण्यास मनाई असेल. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र / हत्यार बाळगण्यास मनाई आहे.