Pimpri Chinchwad | उद्योगनगरी होणार भक्तिमय, आषाढी वारीसाठी महापालिकेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:04 AM2023-05-18T09:04:40+5:302023-05-18T09:06:39+5:30
महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी विविध सेवासुविधा दरवर्षी पुरविण्यात येतात...
पिंपरी : येत्या आषाढी वारीसाठी महापालिकेच्या आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा याची काळजी घेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित विभागांना तातडीने कामकाज करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जून महिन्याच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी दोन्ही संस्थांनांच्या विश्वस्तांबरोबर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी विविध सेवासुविधा दरवर्षी पुरविण्यात येतात. त्यासाठी आयोजित बैठकीत संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्तांनी विविध सूचना केल्या. महापालिका कर्मचारी आणि वारकरी प्रतिनिधी असा संयुक्त स्वागत कक्ष उभारला जावा. पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करावी. रस्त्यातील अतिक्रमणे दूर करावीत, पोलिस बंदोबस्तात वाढ व्हावी, पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, वारकऱ्यांचे भिंतीचित्र खराब झाले आहे, त्यात सुधारणा करावी. स्नान पाण्याचे नियोजन करणे, पालखी पहाटे मार्गस्थ होत असल्याने रस्त्यावरील लाईट साडेसात पर्यंत चालू ठेवाव्यात अशा सूचना केल्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सूचनांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत सर्व सोयी-सुविधा देणार असल्याचे आश्वासन दिले.