Ashadhi Wari 2021: बंडातात्या कराडकर यांना खासगी वाहनातून पाठवले माघारी; पोलिसांनी घेतले होते ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 11:26 AM2021-07-03T11:26:11+5:302021-07-03T11:26:23+5:30
Ashadhi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते.
पिंपरी : पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी शनिवारी पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे संकल्प गार्डन येथे थांबवले होते. त्यानंतर खासगी वाहनाने त्यांना माघारी पाठविण्यात आले.
पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना थांबविले.
पायी वारी करू नये, असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र बंडातात्या आणि वारकरी पायी वारी करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्पुरते ताब्यात घेतले. वडमुखवाडी, चऱ्होली येथे संकल्प गार्डन येथे त्यांना थांबवले. याबाबत माहिती मिळताच काही वारकरी तेथे पोहोचले. त्यांनी भजन म्हणत आंदोलन केले. बंडातात्या यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली. खासगी वाहनाने त्यांना माघारी पाठविण्यात आले.
दरम्यान आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
पायी वारी करीत असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर खासगी वाहनाने त्यांना माघारी पाठविण्यात आले आहे.
- रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड