आयुष्यासह नवीन घराच्या स्वप्नांची राखरांगोळी; काळाचा घाला, दाम्पत्यासह दोन लेकरांचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Published: August 30, 2023 09:27 PM2023-08-30T21:27:08+5:302023-08-30T21:30:02+5:30
आयुष्यासोबत नवीन घराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली...
पिंपरी : व्यवसायानिमित्त पिंपरी - चिंचवड शहरात आले. भाडेतत्त्वावर गाळा घेऊन दुकान सुरू केले. घरभाडे परवडत नसल्याने दुकानाच्या पोटमाळ्यावरच संसार थाटला. स्वत:च्या मालकीचे घर असावे म्हणून पै-पै जमा करून जागा घेऊन बांधकाम केले. काही दिवसांतच गृहप्रवेश करायचा होता. मात्र, काळाने घाला घातला आणि दाम्पत्यासह दोघा लेकरांचा जीव गेला. आयुष्यासोबत नवीन घराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.
चिमणाराम चौधरी यांनी पूर्णानगरला मुलाच्या नावाने सचिन हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान सुरू केले. ‘नीचे दुकान, उपर मकान’ असे सांगणाऱ्या चौधरी यांचे चौकोनी कुटुंब दुकानात राबत तेथेच पोटमाळ्यावर राहत होते. मुले शाळेत जात होती. पोटा-पाण्याचा खर्च भागवून चौधरी यांनी किडूकमिडूक जमवत गाठीशी काही रक्कमही ठेवली. त्यातून शहरालगत कुरुळी येथे प्लाॅट खरेदी करून घराचे बांधकाम सुरू केले. ते कुटुंबासह प्लाॅटवर जात. घराची एक-एक वीट रचली जात असताना गृहप्रवेशाचे स्वप्न रंगवले. बांधकाम पूर्ण होत आले असतानाच बुधवारी दुकानाला आग लागली.
पोटाला चिमटा घेत चौधरी यांनी हक्काच्या घराचे स्वप्न रंगवले होते. मुलांना चांगले शिक्षण देण्याचेही त्यांचे स्वप्न होते. दोघा लेकरांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतला होता. गावाकडे असलेल्या आई - वडिलांनाही या घरात आणायचे होते. मात्र, आगीत सगळ्याच स्वप्नांची राखरांगोळी झाली.
नातेवाईकांची धाव...
आगीच्या दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर परिसरातील चौधरी कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. राजस्थानातील नातेवाइकही गावाकडून निघाल्याचे सांगण्यात आले.