आशिका काळे विजेती
By admin | Published: July 17, 2017 04:05 AM2017-07-17T04:05:41+5:302017-07-17T04:05:41+5:30
पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ कुटप्रश्न सोडविणे स्पर्धेत आशिका काळे, तीर्थ शेवाळे आणि विराज जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ कुटप्रश्न सोडविणे स्पर्धेत आशिका काळे, तीर्थ शेवाळे आणि विराज जोशी यांनी अनुक्रमे ९, १३ आणि १७ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकाविले.
चिंचवड येथील मोरया प्रसाद सभागृहात झालेल्या स्पर्धेत नऊ वर्षांखालील गटात आशिका काळे हिने ११० पैकी ९५ गुण मिळवीत विजेतेपद पटकाविले. ९३ गुण मिळविणारा अमोघ हिरवे उपविजेता ठरला. १३ वर्षांखालील गटात तीर्थ शेवाळेने १०० पैकी ७९ गुण मिळवीत विजेतेपद पटकाविले. साहील शेजलने ७६ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. १७ वर्षांखालील गटात विराज जोशीने १०० पैकी ६८ गुण मिळवीत विजेतेपद पटकाविले. ६६ गुणांसह सुजल पाटीलने उपविजेतेपद पटकाविले.
पारितोषिक वितरण पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार मिलिंद पाध्ये, सामाजिक कार्यकर्ते सुधीर चिंचवडे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत यांनी केले. त्यांनी कूटप्रश्न स्पर्धा आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. आभार पद्मानंद मेनन यांनी मानले. सूत्रसंचालन मनीषा भागवत यांनी केले. या स्पर्धेबरोबर विविध वयोगटांसाठी जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात धु्रपद पटारी, अमोघ हिरवे, शिवराम पिंगळे, सोहम सिन्हा आणि आशय वांगीकर यांनी अनुक्रमे ७, ९, ११, १३ आणि १७ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. मुख्य पंच म्हणून पवन राठी यांनी आणि सहायक पंच म्हणून कुशाल शिंदे, उमेश खेंगरे, गुरुनाथ कुलकर्णी, शुभम चतुर्वेदी, अच्युत हिरवे आणि विकास देशपांडे यांनी काम पाहिले.