दिघीत चार हजारांची लाच घेताना सहायक फौजदारास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:13 PM2020-10-16T17:13:10+5:302020-10-16T17:13:23+5:30
गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली.
पिंपरी : आरोपीला मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना एका सहायक फौजदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. १५) दिघी पोलीस ठाण्यात ही कारवाई केली.
निवृत्ती सदाशिव चव्हाण (वय 56) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. चव्हाण हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्यास तक्रारदार यांनी तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने चव्हाण यांना चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
पुण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षिरसागर, सुनील बिले, पोलीस कर्मचारी वैभव गोसावी, गणेश भापकर, प्रशांत वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.