एटीएम घरात अन् पैसे चोरांच्या खिशात, परस्पर काढली जातेय रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:51 AM2019-02-11T04:51:00+5:302019-02-11T04:51:12+5:30
एटीएम कार्ड जवळ असतानाही संबंधित बँक खातेदाराच्या मोबाइलवर ‘..... रुपीज डेबिटेड युवर अकाउंट’ असे एटीएमद्वारे रक्कम काढल्याचे मेसेज येऊन धडकत आहेत.
पिंपरी : एटीएम कार्ड जवळ असतानाही संबंधित बँक खातेदाराच्या मोबाइलवर ‘..... रुपीज डेबिटेड युवर अकाउंट’ असे एटीएमद्वारे रक्कम काढल्याचे मेसेज येऊन धडकत आहेत. मात्र, ही रक्कम मूळ खातेदाराकडील अधिकृत एटीएमद्वारे न काढली जाता परस्पर अज्ञात व्यक्तीकडून काढली जात आहे. त्यामुळे एटीएम कार्ड घरात अन् पैसे चोरांच्या खिशात, असे म्हण्याची वेळ संबंधितांवर येत आहे. यातून अनेकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.
चिंचवड येथील मीना सोनवणे यांचे महाराष्ट्र बँकेत खाते आहे. या बँकेचे त्यांच्याकडे एटीएम कार्डही आहे. दरम्यान, त्यांचे एटीएम कार्ड त्यांच्याजवळ असतानाही ८ फेबु्रवारीला दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांच्या एटीएममधून दोन हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आला. असाच प्रकार शमीम सय्यद यांच्याबाबत घडला. त्यांच्या बँक खात्यातून ५ फेब्रवारीला रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सुरुवातीला एक हजार काढल्याचा तर काही मिनिटांतच पुन्हा दहा हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आला. दरम्यान, जुने एटीएम कार्ड व चीफ असलेले नवीन कार्ड असे दोन्हीही कार्ड त्यांच्या जवळच होते. तरीही त्यांच्या खात्यातून ११ हजार काढल्याचा प्रकार घडला.
एटीएम कार्डाबाबत ग्राहकांनी घ्यावी दक्षता
सध्या मोबाइलवर विविध आॅफर्ससाठी फोन येत असतात. यावर आॅफर्सचे आमिष दाखवून फोनवरील व्यक्तीकडून बँकेचा खातेक्रमांक, एटीएम कार्डचा पिन क्रमांक तसेच इतरही गोपनीय माहिती घेतली जाते. त्यानंतर बनावट एटीएम कार्ड तयार करून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्याचे प्रकार घडतात.