ॲट्रॉसिटी कायदा: पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत २० गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:31 PM2021-10-14T13:31:12+5:302021-10-14T13:34:12+5:30
-नारायण बडगुजर पिंपरी : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायद्यांतर्गत गुन्हे वाढत आहेत. यंदा जानेवारी ते सप्टेंबर ...
-नारायण बडगुजर
पिंपरी : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायद्यांतर्गत गुन्हे वाढत आहेत. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत २० गुन्हे दाखल झाले. त्यातील सहा गुन्हे सप्टेंबरमध्ये दाखल झाले. यात बलात्कार, विनयभंग यासह जमीनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकार जास्त आहेत.
खून, दरोडा, लुटमार, अशा गंभीर गुन्ह्यांसह महिला अत्याचारांच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यात जातीवाचक बोलून हिणवण्याचे प्रकार घडतात. असे कृत्य करून अत्याचार केल्याचेही काही घटनांवरून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असतानाही गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते.
अल्पवयीनांचा समावेश-
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील पीडितांमध्ये काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल २० प्रकरणांमध्ये ५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
नऊ महिन्यांत ४२ जणांना अटक-
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये नऊ महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४२ जणांना अटक केली. तसेच दाखल २० गुन्ह्यांपैकी नऊ प्रकरणे न्यायालयात असून, १० गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या २० गुन्ह्यांमध्ये २३ पीडित असून त्यात १७ महिलांचा समावेश आहे.
बलात्काराची सात प्रकरणे-
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल २० गुन्ह्यांमध्ये सात गुन्हे बलात्कार प्रकरणी आहेत. यात दोन गुन्हे बाल लैंगिक अत्याचाराचे असून त्यात एका मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा आहे. पीडित महिला ही अनुसूचित जाती जमातीची असल्याचे माहीत असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तसेच प्रेमसंबंधातून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पाच गुन्हे विनयभंग प्रकरणी आहेत. जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी सात तर खून प्रकरणी एक गुन्हा ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल आहे.
चाकण पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल-
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत नऊ महिन्यांमध्ये दाखल २० पैकी सर्वाधिक सात गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दिघी पोलीस ठाण्यात तीन, वाकड व भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, निगडी, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, महाळुंगे, सांगवी या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला.
ॲट्रॉसिटी कायदा १९८९ व नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे-
वर्ष - गुन्हे
२०१९ - ४७
२०२० - २१
२०२१ (सप्टेंबरपर्यंत) - २०