पिंपरी महापालिकेच्या निवृत्त आरोग्य अधिकाऱ्याच्या कुटुंबावर हल्ला; मंडप काढण्यावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:37 PM2022-10-07T13:37:27+5:302022-10-07T13:37:37+5:30
हल्ल्यामध्ये पाच ते सात जण जखमी
पिंपरी : नवरात्रोत्सवात दांडीयासाठी लावलेला मंडप काढताना महापालिकेचे निवृत्त आरोग्य अधिकारी अनिल राॅय यांच्या सुनेसोबत झालेल्या भांडणातून मंडप काढण्याऱ्या मुलांनी राॅय यांच्या कुटुंबावर काल हल्ला केला. यामध्ये हल्ल्यामध्ये पाच ते सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये रॉय यांच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी अनिल राॅय आणि मंडप काढणारी मुले यांच्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काळभोरनगर येथे मांडव काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रॉय यांची सुन गाडी घेऊन जात असताना मंडपाच्या खाली पडलेल्या पडद्यामध्ये असलेल्या लाईटवर त्यांची गाडी गेली. त्यातून मंडप काढणारा मुलगा आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. मंडप काढणाऱ्या तरुणाने आणखी काही मुलांना बोलवून घेतले. या मुलांनी या मंडप काढणाऱ्या ठिकाणी मुलांना विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठाला मारहाण केली. तसेच डॉ. रॉय यांच्यावर देखील हल्ला केला. मारहाण करून पळून जाणाऱ्या मुलांपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी पकडून पिंपरी पोलीस ठाण्यात आणले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.